मिरज (जि. सांगली) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन म्हणजे आरपार आणि अटीतटीची अंतिम लढाई असणार आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मिरजेत पत्रकार बैठकीत दिली.जरांगे-पाटील गुरुवारी (दि. ७) मिरजेत मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी आपण राज्यभरात आघाडी उघडली. त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारला ५८ लाख जुन्या नोंदी मिळाल्या आहेत. त्या सर्व नोंदींतून मराठा व कुणबी एकच आहे, हे स्पष्टपणे पुढे आले आहे. हजारो कुणबी बांधवांना कुणबी प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
शांततेच्या मार्गानेच आंदोलनजरांगे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने सुरू राहील. सरकारने आपली माणसे पाठवून आंदोलनात भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसक आंदोलन करणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू राहील. सांगली जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे.