मुख्यमंत्री चषक कबड्डी: ठाणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर, पुणे ग्रामीणची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:30 IST2024-12-31T12:29:37+5:302024-12-31T12:30:39+5:30
आक्रमक चढाया, हनुमान उडीचा थरार

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : सांगलीवाडीतील चिंचबागेत सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री चषक’ ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आक्रमक चढाई, हनुमान उडी, सुपर टॅकल असा थरार अनुभवास येत असून, प्रेक्षक गॅलरी खचाखच भरत आहे. ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड, मुंबई उपनगर, पुणे ग्रामीण आदी संघांनी विजयाकडे आगेकूच केल्याचे तिसऱ्या दिवशी दिसून आले.
कुमार गटाच्या सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी जालना संघाने सोलापूरचा, कोल्हापूरने हिंगोलीचा, परभणीने धुळेचा, पुणे शहरने मुंबई शहर पश्चिमचा, पालघरने धाराशिवचा, छत्रपती संभाजीनगरने साताराचा, ठाणे ग्रामीणने मुंबई शहर पूर्वचा, रायगडने बीडचा, नंदूरबारने नांदेडचा, सांगलीने नाशिक शहरचा, पिंपरी-चिंचवडने अहिल्यानगरचा, पुणे ग्रामीणने लातूरचा, मुंबई उपनगर पूर्वने रत्नागिरीचा पराभव केला. जळगाव जिल्हा विरुद्ध नाशिक ग्रामीण सामना बरोबरीत सुटला. ठाणे शहरने सिंधुदुर्गचा पराभव केला.
सोमवारी सायंकाळी लातूरने नाशिक ग्रामीणचा (२९-२६), ठाणे शहरने नंदूरबारचा (३८-२२), पुणे ग्रामीणने जळगावचा (५९-२१), मुंबई उपनगर पश्चिमने मुंबई शहर पश्चिमचा (५२-४६), पिंपरी-चिंचवडने साताराचा (६६-१८), अहिल्यानगरने छत्रपती संभाजीनगरचा (४३-२७) असा पराभव केला.
रात्री सांगली विरुद्ध ठाणे ग्रामीण हा तिसऱ्या दिवशीचा अत्यंत चुरसीचा सामना झाला. दोन्ही बाजूंनी आक्रमक चढाया, पकडी करत सुपर टॅकल करत उत्कंठा वाढवली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात २८-२८ अशी शेवटची चार मिनिटे बाकी असताना बरोबरी होती. शेवटच्या मिनिटाला ३१-३१ अशी बरोबरी होती. ठाणे ग्रामीणला चढाईची संधी होती, तेव्हा चढाई करणाऱ्याने अत्यंत चपळाईचे दर्शन घडवत बोनस गुण वसूल केला. अवघ्या एका गुणाने ठाणे ग्रामीणने विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.
कबड्डी शौकीनांची तोबा गर्दी
सांगलीवाडीतील चिंचबागेत कबड्डी म्हंटले की खचाखच गर्दी होते. यंदाच्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी प्रेक्षक गॅलरी खचाखच भरत आहे. काही उत्साही मंडळी नवीन पुलावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत, तसेच गॅलरीच्या बाजूला गर्दी करून सामने बघितले जात आहेत.
सर्वच संघांकडून उत्कृष्ट खेळ
यंदाच्या कुमार-कुमारी कबड्डी स्पर्धेत जवळपास सर्वच संघांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन होत आहे. त्याचबरोबर पकडीही केल्या जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांकडून दाद दिली जात आहे.