राजकारणासाठी लोकांना भडकविण्याचा कार्यक्रम : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:08 IST2025-03-03T12:07:40+5:302025-03-03T12:08:13+5:30
सांगलीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सदानंद मोरे यांचा गौरव

राजकारणासाठी लोकांना भडकविण्याचा कार्यक्रम : जयंत पाटील
सांगली : अलीकडच्या काळात सर्वधर्मसमभाव कमी होताना दिसत आहे. धर्मा-धर्मांत, जाती-जातींत संघर्ष दिसत आहे. त्याच्यावर कुणाची तरी राजकीय पोळी भाजून निघत आहे. समाजातील लोकांची मने भडकावण्याचा कार्यक्रम देशाला अधोगतीकडे नेणारा आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने रविवारी भावे नाट्यमंदिरात झालेल्या सोहळ्यात ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. लताताई देशपांडे आणि धार्मिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असलेले आप्पासाहेब पाटील यांना ऋणानुबंध पुरस्काराने, तर भवाळकर यांना ‘ब्रँड सांगली’ पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वजित कदम, माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, राजकारणाला राजनीतीचे अधिष्ठान असावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केले; मात्र त्याला राजनीतीचा आधार आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांनाही राजकारण करावे लागले. मात्र त्याला राजनीतीचे अधिष्ठान होते; परंतु आजच्या राजकारणात राजनीतीचे अधिष्ठान कमी होत आहे; ते पूर्ववत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, सहकार क्षेत्र नावाची काय भानगड हे सांगलीत आल्यावर कळले. सहकार नसता तर ग्रामीण भागापर्यंत शिक्षण, उद्योग पोहोचू शकले नसते. लोकशाही कशी असावी, याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रातून केली आहे. राजनीतीमध्ये नैतिकता आहे आणि ती प्रत्येक क्षेत्रात असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कृष्णेच्या पाण्यात मुक्त झाल्यासारखे वाटते
जयंत पाटील म्हणाले, कृष्णा नदीचे पाणी देशातील सर्व नद्यांमध्ये पवित्र आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे नरसोबावाडी किंवा हरिपूरच्या संगमात जरी डुबकी मारली तरी आम्हाला सगळ्यांतून मुक्त झालो असे वाटते.
संस्थात्मक वारशावरून टोला
वडिलांनी चालवलेल्या सहकारी संस्था त्याच आदर्शाने पुढे चालविणे सर्वच वारसदारांना जमते असे नाही. बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी वारसा म्हणून मिळालेल्या संस्था समर्थपणे चालवल्या आहेत. मात्र अनेकांना असा वारसा चालवता आला नाही, असा टोला पृथ्वीराज पाटील यांनी लगावला.