दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहित साखर निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:00 IST2017-12-11T00:59:50+5:302017-12-11T01:00:37+5:30

दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहित साखर निर्मिती
दिलीप मोहिते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अॅण्ड अॅग्रो या नावाने रसायनविरहित साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार करण्यात आला असल्याचे संस्थापक, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.
साखरेपासून उपपदार्थांची निर्मिती सर्वच कारखाने करतात. परंतु, या पारंपरिक साखर कारखानदारीला छेद देत अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करीत विराज केन्सने रसायनविरहित साखर निर्मितीचा ‘जॅग्री शुगर’ उत्पादनाचा देशातील पहिला प्रकल्प आळसंद-खंबाळे येथील सुमारे १९ एकर माळरानावर उभा करण्यास सुरुवात केली आहे. तो आता अंतिम टप्प्यात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्पादित रसायनविरहित साखर परदेशात निर्यात होणार असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार केला आहे. प्रतिदिन १२५० टन ऊस गाळप क्षमता असलेला हा प्रकल्प शंभर टक्के स्वयंचलित आहे.
सध्या जागतिक बाजारपेठेत रसायनविरहित साखर, गूळ, गुळाची पावडर, खांडसरी साखर या पदार्थांना सर्वाधिक मागणी असल्याने या पदार्थांच्या निर्मितीलाच विराज केन्स प्राधान्य देणार आहे.