जत : सनमडी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली असून लैंगिक अत्याचारप्रकरणी सनमडीच्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.या आश्रमशाळेतील शिक्षकांची समाजकल्याण खात्याकडून आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडून शुक्रवारी दिवसभर पोलिस बंदोबस्तात चौकशी सुरू होती. या आश्रमशाळेतील शिक्षकाने सात मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. बुधवार दि. २३ रोजी आश्रमशाळेला सुट्टी होती. या आश्रमशाळेतील मुलींना घरी सोडण्यासाठी करेवाडी (ता. जत) येथे आश्रमशाळेची बस घेऊन गेली होती. ज्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता. तोही शिक्षक, चालक व महिला शिक्षिका सोबत होती. या मुली घरी गेल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती नातेवाइकांना दिली. लगेच नातेवाइकांनी त्या शिक्षकास मारहाण केली. तसेच चालकासही मारहाण केली. एक महिला शिक्षिकेने मात्र या ठिकाणाहून पळ काढला.
शिक्षकास मारहाणकरेवाडी (ता. जत) येथील शिक्षकास मारहाण केल्याची घटना वाऱ्यासारखी तालुकाभर पसरली. त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समजताच समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी शुक्रवारी सकाळी दहा वाजता आश्रमशाळेत दाखल झाले. आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांची चौकशी केली. यात लैंगिक शोषण झाल्याचे तपासात व चौकशीत उघड झाले.
उमदी पोलिस ठाण्यातदेखील संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
त्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाईयाबाबत आश्रमशाळेच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास सनमडीकर म्हणाले की, संस्थेच्या संचालकांच्या बैठकीत संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे दिला असल्याचे त्यांनी सांगितले.