बांधकाम झाले स्वस्त, पण गृहकर्ज महागले; सांगा घर बांधायचे कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:23 IST2022-08-04T14:22:44+5:302022-08-04T14:23:21+5:30
एरवी पावसाळ्यात २५ टक्क्यांनी घटणारी बांधकाम साहित्याची मागणी यंदा ३५ टक्क्यांनी कमी झाली

बांधकाम झाले स्वस्त, पण गृहकर्ज महागले; सांगा घर बांधायचे कसे?
अविनाश कोळी
सांगली : बांधकाम साहित्याचे दर उतरल्यामुळे घराच्या स्वप्नांचे इमले मनात बांधणाऱ्यांना दुसरीकडे गृहकर्जाच्या दरवाढीने हादरविले आहे. एरवी पावसाळ्यात २५ टक्क्यांनी घटणारी बांधकाम साहित्याची मागणी यंदा ३५ टक्क्यांनी कमी झाली आहे. अनेकांनी त्यामुळे घरासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिमेंट, स्टील व अन्य बांधकाम साहित्याच्या दरात वर्षाच्या सुरुवातीला मोठी वाढ झाल्यानंतर अनेकांच्या घराच्या स्वप्नांना तडे गेले होते. साहित्याचे दर कमी होण्याची लोकांना प्रतीक्षा होती. आता दर उतरत असले तरीही त्यांना हे स्वप्न साकारता येत नसल्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर गेल्या काही महिन्यात गृहकर्जासह सर्वच प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढणार आहे.
बांधकामाचा खर्च जितका कमी झाला आहे, त्यापेक्षा अधिक खर्चाचा भार गृहकर्जातून वाढणार असल्याने अनेकांचा घरांचा बेत लांबणीवर गेला आहे. प्रत्येक पावसाळ्यात बांधकामांचे प्रमाण घटत असते. त्यामुळे साहित्याच्या मागणीत सुमारे २० ते २५ टक्के घट होत असते, मात्र यंदा ही घट ३५ टक्क्यांपर्यंत नोंदली गेली.
बांधकाम साहित्य झाले स्वस्त
रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पाच महिन्यांपूर्वी प्रतिटन ९० हजार रुपयांवर गेलेले माईल्ड स्टील आता ६३ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. स्टेनलेस स्टीलचा दरही प्रतिकिलो ३२५ रुपयांवरुन २८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. सिमेंटचा भाव दोन महिन्यात २० ते ४० रुपयांनी उतरला आहे. क्रश सँडचा भाव महिन्यात प्रतिब्रास ५०० ते १ हजार रुपयांनी घटला आहे.
गृहकर्ज दराची चिंता
मे व जूनमध्ये रेपो दरात एकूण ०.९ टक्के वाढ झाली. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे तितक्या प्रमाणात वाढली. जे कर्ज ६.४० टक्के व्याजदराने मिळत होते ते आता ७.५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढला आहे.
स्टीलच्या मागणीत यंदा नेहमीपेक्षा अधिक घट नोंदली आहे. दर जेव्हा जास्त होते तेव्हाही उत्पादकांना मागणीतील घट अनुभवास आला. - संजय खांबे, स्टील उद्योजक
ज्यांनी जुन्या व्याज दराने गृहकर्ज घेतले आहे, त्यांना वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे. अद्याप गृहकर्ज आवाक्यात असले, तरी यापुढे थोडे जरी दर वाढले तर गृहप्रकल्पांना फटका बसेल. - दीपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष, क्रेडाई