..त्यामुळे भारतात घुसखोरी, पोलिस तपासात झाले निष्पन्न; सांगलीत अटक केलेला बांगलादेशी नेमका कसा आला..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:54 IST2025-03-18T16:53:53+5:302025-03-18T16:54:28+5:30
‘आयबी’ कडून चौकशी

..त्यामुळे भारतात घुसखोरी, पोलिस तपासात झाले निष्पन्न; सांगलीत अटक केलेला बांगलादेशी नेमका कसा आला..वाचा
सांगली : सांगली शहरात संशयास्पदरित्या फिरताना शहर पोलिसांनी अटक केलेला बांगलादेशी घुसखोर एम.डी अमिर हुसेन (वय ६२, रा. उत्तर अदाबोर, मोहम्मदपूर, ढाका, बांगलादेश) हा तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचा कट्टर समर्थक असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. बांगलादेशातील हिंसाचारामुळे विरोधकांकडून जीवाला धोका असल्याने तो भारतात आल्याचे निष्पन्न झाले.
शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार हे पथकासह गस्त घालत असताना दि. १६ रोजी पहाटे त्यांना हायस्कूल ऱस्त्यावर एका इन्स्ट्ट्यूिटसमोर वृद्ध संशयास्पद फिरताना आढळला. त्याने हिंदी भाषेत अमिर शेख नाव सांगितले. परंतु त्याची हिंदी भाषा स्पष्ट नसल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. पत्ता विचारल्यानंतर दिल्लीत राहत असल्याचे सांगितले. दिल्लीत कुठे विचारता त्याला काहीच सांगता आले नाही. सांगलीत कशासाठी आलास? विचारणा केल्यानंतर कपड्याच्या व्यापारासाठी आल्याचे उत्तर दिले.
शेख याच्याबाबत संशय वाढत गेला. त्यामुळे त्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यातील संपर्क क्रमांक, व्हॉटस् ॲप, आयएमओ ॲपमध्ये असलेले नंबर ८८० या बांगलादेशी कोडचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली तेव्हा त्याने खरे नाव एम. डी. अमिर हुसेन असून ढाका येथे राहत असल्याचे सांगितले. बांगला देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचा तो जवळपास ३० वर्षांपासून कट्टर कार्यकर्ता असल्याचे सांगितले. शेख हसीना यांच्याविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर हिंसाचारामध्ये जीवाला धोका असल्यामुळे ढाक्यातून तो अन्यत्र पळाला.
त्रिपुरातून भारतात प्रवेश..
१३ मार्चला हुसेन त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथून कोलकाता येथे आला. तेथून पुणे येथे आला. पुण्यातून तो बसने थेट सांगलीत आला. त्याने अमिर शेख या नावाने बनावट आधारकार्ड बनविले होते. त्याआधारे तो सांगलीत लॉजवर राहत होता. रात्री जेवणासाठी बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकल्याने फिरत असताना पोलिसांनी बरोबर त्याला हेरले.
युट्यूबवर शेख हसिनांचे व्हिडिओ
हुसेन याच्या मोबाईलवरील यु ट्यूबवर हिस्ट्री बघितल्यानंतर शेख हसिना यांचे व्हिडिओ पोलिसांना आढळले. इतर ॲपवर देखील बांगलादेशातील माहिती आढळून आली.
शहर पोलिसांचे कौतुक
बांगलादेशातील घुसखोर हजारो किलोमीटरवरून थेट सांगलीत येईपर्यंत कुठेही सापडला नाही. मात्र सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो सापडला. याबद्दल वरिष्ठ पोलिसांनी सांगली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
‘आयबी’ कडून चौकशी
सांगलीत यापूर्वी वेश्या व्यवसायात आलेल्या बांगलादेशी महिलांवर कारवाई झाली आहे. परंतु बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई प्रथमच झाली. त्यामुळे ‘इंटेलिजन्स ब्युरो’, गुप्तवार्ता विभागासह जिल्हा विशेष शाखेने याची माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवल्याचे समजते.