Sangli: ३० तास स्टेशनवर 'तो' बेशुद्ध होता अन् दुर्लक्षामुळे गेला जीव; किर्लोस्कवाडीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना
By अविनाश कोळी | Updated: April 29, 2025 19:12 IST2025-04-29T19:11:26+5:302025-04-29T19:12:04+5:30
स्टेशन प्रबंधक यांना आरपीआय व भाजपच कार्यकर्त्यांकडून मागणीचे निवेदन

संग्रहित छाया
किर्लोस्करवाडी : येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर शनिवारी २६ ते रविवार दि. २७ एप्रिलपर्यंत तब्बल ३० तास एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याच्याकडे ना रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले ना अन्य कुणी. त्यामुळे त्याचा जीव गेला. याप्रकरणी आरपीआय व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे.
येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक नागरिक बेशुद्ध अवस्थेत आढळला. तो प्रवासी म्हणून तिथे उतरला होता. ३० तासानंतर काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावर रेल्वे प्रशासनाने १०८ ला फोन करून सांगली सिव्हिल येथे त्याला पाठवून दिले. परंतु उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. या व्यक्तीवर वेळेत प्रथमोपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. दररोज हजारो प्रवासी असणाऱ्या या स्टेशनवर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिस यांचा वावर असतो. निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
संबंधित प्रकरणात त्या दिवशी ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिस अधिकारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा आणि आरपीआयच्यावतीने स्टेशन प्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी धनंजय माने, निहाल नदाफ, राजू मुजावर हजर होते.
..तर तीव्र आंदोलन करु
दहा दिवसांत सदर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अमीर पठाण यांनी दिला आहे.
सदरच्या व्यक्तीला बाहेरच्या कुणीतरी आणून सोडले असावे. आम्ही त्याला चौकशी करून काही फळे खायला दिली होती. स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. - मुरलीधर, स्टेशन प्रबंधक.