World Tuberculosis Day: सांगली जिल्ह्यात दरवर्षी आढळतात २ हजारांवर क्षयरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:39 IST2026-03-24T18:38:14+5:302026-03-24T18:39:38+5:30

क्षयरोगाचा क्षय करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत

Over 2000 tuberculosis patients are found in Sangli district every year | World Tuberculosis Day: सांगली जिल्ह्यात दरवर्षी आढळतात २ हजारांवर क्षयरुग्ण

संग्रहित छाया

सांगली : जिल्ह्यात दरवर्षी २ हजारांहून अधिक क्षयरुग्ण आढळत असून, क्षयरोग अद्याप सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर समस्या ठरत आहे. मात्र, वेळेवर निदान, नियमित उपचार आणि जनजागृती वाढविल्यास क्षयरोगाचा पूर्णतः क्षय करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागात कुपोषण, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि जागरूकतेचा अभाव यामुळे क्षयरोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. शहरी भागातही गर्दी, प्रदूषण आणि अस्वच्छता ही कारणे रोगाचा प्रसार वाढवितात.

कोविडनंतरच्या काळात नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण दुर्दैवाने काही अंशी वाढताना दिसत आहे. २०२४ मध्ये जगभरात एक कोटीहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले. त्या एका वर्षात जगभरात १२ लाखाहून अधिक रुग्ण क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडले. यातील गंभीर करणारी बाब म्हणजे जगातील क्षयरुग्णांपैकी २५ टक्के क्षयरुग्ण भारतात आहेत.

दरवर्षी २४ मार्चला दिन

२४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. २४ मार्च १८८२ या दिवशी ‘रॉबर्ट कॉक’ नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने क्षयरोगाला कारणीभूत असणाऱ्या ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’ या जंतूचा शोध लावला.

कशामुळे होतो क्षयरोग

फुफ्फुसाचा क्षयरोग हा क्षयरुग्णाच्या थुंकीतून सर्वत्र पसरु शकतो. क्षयरोग ज्या व्यक्तीला झालेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या थुंकीत क्षयजंतू आहेत, त्या व्यक्तीने संपूर्ण काळजी घेणे गरजेचे असते. कुठेही थुंकणे, खोकणे , शिंकणे , मोठ्याने बोलणे या सर्व क्रियांतून तुषारांवाटे हे जंतू हवेत पसरतात. मधुमेह, कर्करोग, एचआयव्ही बाधित व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

ही आहेत लक्षणे

संध्याकाळी बारीक ताप येणे, रात्री दरदरून घाम येणे, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, खोकला येणे, खोकल्यातून कफ / बेडके किंवा रक्त पडणे, दम लागणे ही क्षयरोगाची लक्षणे औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसांत कमी होतात.

मध्येच उपचार बंद करणे धोक्याचे

क्षयरोग संपूर्ण बरा होण्यासाठी किमान सहा महिने, न चुकता सलगपणे उपचार घ्यावा लागतो. पण लक्षणे कमी होताच, अनेकजण औषधोपचार मध्येच बंद करतात. अशा मध्येच उपचार बंद करण्यामुळे, औषधाला दाद न देणारा अतिचिवट एम.डी.आर. आणि एक्स.डी.आर. प्रकारचा क्षयरोग- टी.बी. निर्माण होऊ शकतो, असे छातीरोग तज्ज्ञ डॉ. अनिक मडके यांनी सांगितले.

एकदा का निदान झाले की तातडीने औषधोपचार सुरू करणे आवश्यक असते. औषधोपचाराबरोबरच सकस आहार-विशेषकरून प्रथिनेयुक्त आहाराची नितांत आवश्यकता असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास यावर मात शक्य आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. - डॉ. अनिल मडके, छातीरोग विशेषज्ञ, सांगली

Web Title : सांगली में टीबी के मामले अधिक: रोकथाम है महत्वपूर्ण, विशेषज्ञों का कहना है

Web Summary : सांगली जिले में हर साल 2,000 से अधिक टीबी के मामले सामने आते हैं। प्रारंभिक निदान, उपचार और जागरूकता महत्वपूर्ण हैं। कुपोषण और स्वच्छता की कमी योगदान करते हैं। विशेषज्ञों ने दवा प्रतिरोधी टीबी से बचने के लिए पूर्ण उपचार पर जोर दिया। प्रोटीन युक्त आहार भी महत्वपूर्ण है।

Web Title : Sangli Faces High TB Cases: Prevention is Key, Experts Say

Web Summary : Sangli district reports over 2,000 TB cases annually. Early diagnosis, treatment, and awareness are crucial. Malnutrition and lack of hygiene contribute. Experts emphasize complete treatment to avoid drug-resistant TB. A protein-rich diet is also important for recovery.