सांगलीतील विट्याचे प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या चौकशीचे आदेश, महसुलमंत्र्यांची विभागीय आयुक्तांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 16:04 IST2022-12-02T15:50:51+5:302022-12-02T16:04:41+5:30
लोकांना अरेरावी करणे, अपमानास्पद वागणूक देऊन कामात दिरंगाई करणे यासह अनेक तक्रारी

सांगलीतील विट्याचे प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या चौकशीचे आदेश, महसुलमंत्र्यांची विभागीय आयुक्तांना सूचना
दिलीप मोहिते
विटा : लोकांना अरेरावी करणे, त्यांच्याशी उध्दट बोलणे तसेच वकीलांना अपमानास्पद वागणूक देऊन कामात दिरंगाई करणे यासह अनेक तक्रारींचे आरोप असलेले खानापूर-आटपाडी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष भोर यांची खातेनिहाय चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तातडीने शासनाला सादर करावा, असे आदेश महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले. खासदार संजयकाका पाटील यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर कार्यवाही सुरू झाली आहे.
विटा उपविभागीय अधिकारी संतोष भोर हे भ्रष्टाचारी असून लोकांना अरेरावी करणे, विनाकारण कामात अडथळा करणे तसेच उध्दट वर्तन करून वकीलांना पक्षकारांसमोर अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. विटा व आटपाडी वकील बार संघटनेच्यावतीनेही याबाबत रितसर लेखी तक्रार केली होती. त्यामुळे प्रांताधिकारी भोर यांच्यासमोर खटले न चालविण्याचाही ठराव या वकील संघटनांनी घेतला होता.
याबाबतची माहिती नागरीकांनी खासदार संजयकाका पाटील यांना दिली होती. त्यानंतर खा. पाटील यांनीही याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनाही असाच अनुभव आला होता. त्यापार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी प्रांताधिकारी भोर यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे लेखी केली होती. याची दखल घेत महसुलमंत्री विखे-पाटील यांनी प्रांताधिकारी संतोष भोर यांची चौकशी करून अहवाल तातडीने अभिप्राय व आवश्यक कागदपत्रांसह तात्कार शासनास सादर करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांना दिला.