बोंबाळेवाडी येथे डॉक्टर, परिचारिकेला शिवीगाळ, दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:24 IST2021-05-24T19:19:22+5:302021-05-24T19:24:30+5:30
Crimenews Doctor Sangli : बोंबाळेवाडी (ता. कडेगाव) येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. उपसरपंचांनी डॉक्टर व परिचारिकेला दमदाटी केल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार आहे.

बोंबाळेवाडी येथे डॉक्टर, परिचारिकेला शिवीगाळ, दमदाटी
सांगली : बोंबाळेवाडी (ता. कडेगाव) येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. उपसरपंचांनी डॉक्टर व परिचारिकेला दमदाटी केल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार आहे.
शाळगावमध्ये आरोग्य उपकेंद्राअंतर्गत बोंबाळेवाडी येथे दमदाटी व शिवीगाळीचा प्रकार घडला. एका कोरोना संशयित रुग्णाने आरटीपीसीआर चाचणीवेळी परिचारिका आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला दमदाटी केली. याची माहिती जिल्हा परिषदेला देण्यात आली. त्याची गंभीर दखल डुडी यांनी घेतली. ते म्हणाले की, संबंधितावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याशी चर्चा झाली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी आणि परिचारिका कोरोना चाचण्यांसाठी गावात गेले होते.
तपासणीदरम्यान एका ग्रामस्थाची रॅपिड ॲंंटीजन चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे चाचणीवर त्याने संशय घेतला. कर्मचाऱ्यांशी वाद घातला. मी निगेटीव्ह असून आरटीपीसीआर चाचणी केलीच पाहिजे असा दबाव आणला. कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिल्यानंतर शिवीगाळ केली. यादरम्यान, तेथील उपसरपंचांनी कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ केली. दमबाजी केली. तशी तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
डुडी म्हणाले की, या घटनेने कर्मचारी दबावाखाली आले आहेत. गावात सहकार्य होत नसेल आणि दमदाटी केली जात असेल तर तेथे काम करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा झटून काम करत असताना उपसरपंचासारख्या जबाबदार व्यक्तीने दमदाटी करणे गंभीर आहे. त्याची गय केली जाणार नाही.
कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. त्यांना सहकार्य करण्याऐवजी धमकी देणे योग्य नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. उपसरपंचासह या प्रकरणात नाहक तपासणीसाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल केला जाईल. कर्मचाऱ्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करू. लोकांनीही सहकार्य करायला हवे.