सांगली जिल्ह्यातील 'या' गावात वर्षभरात फक्त एकाच मुलीचा जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:33 IST2025-01-08T17:33:14+5:302025-01-08T17:33:51+5:30
ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथे चालू वर्षात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे सात हजार रुपये ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने ...

सांगली जिल्ह्यातील 'या' गावात वर्षभरात फक्त एकाच मुलीचा जन्म!
ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथे चालू वर्षात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे सात हजार रुपये ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. सरपंच संदीप सावंत यांनी ही माहिती दिली.
‘राजमाता जिजाऊ लाडकी सुकन्या योजना’ या नावाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०२४ या गेल्या वर्षभरात ५००० रुपयांची ठेव ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वर्षभरात सात अपत्ये जन्मली, त्यापैकी स्वामिनी नीलेश माने ही एकमेव मुलगी होती. या सुकन्येच्या नावे ठेव ठेवण्यात आली. यावर्षी ठेवीची रक्कम वाढवून सात हजार रुपये केली आहे. भविष्यात ही रक्कम आणखी वाढविण्याचा विचार असल्याचे सरपंच सावंत यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच स्नेहलता माने, संदीप काईंगडे, विष्णू सावंत, कृष्णा ढगे-पाटील, कमल माने, धनश्री लवंद, रंजना खोत व ग्रामसेविका लतिका जाधव उपस्थित होत्या.
सावंत म्हणाले की, ढगेवाडी गावाला पुरोगामी विचारसरणीचा इतिहास आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या या छोट्या गावात मुलींचा जन्मदर वाढावा व समाजात महिलांना सन्मानाने वागणूक मिळावी, या हेतूने योजना राबविण्यात येत आहे.