अकरावी ऑनलाइन प्रवेशास प्रारंभ; सांगली जिल्ह्यात जागा ३७,१६४ अन् विद्यार्थी ३६,९८९
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:18 IST2025-05-21T16:18:10+5:302025-05-21T16:18:27+5:30
हजारांच्यावर जागा रिक्त राहणार : विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांचे प्राधान्य, वाणिज्य, कला शाखा अडचणीत

अकरावी ऑनलाइन प्रवेशास प्रारंभ; सांगली जिल्ह्यात जागा ३७,१६४ अन् विद्यार्थी ३६,९८९
सांगली : जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यंदा एकंदरीत ३७ हजार १६४ प्रवेश क्षमतेच्या तुलनेत ३६ हजार ९८९ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. परिणामी, सुमारे १० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे. दोन दिवस विद्यार्थ्यांना सरावासाठी देण्यात आले असून, प्रत्यक्षात २१ मेपासून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.
शिक्षण विभागाने यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची पहिली प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमध्ये ३७ हजार १६४ जागा प्रवेशासाठी मिळणार आहेत; मात्र यंदा जिल्ह्यात ३६ हजार ९८९ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. पण, या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे १० हजारांवर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचा कल यंदाही विज्ञान शाखेकडे अधिक राहणार असल्याचे चित्र आहे. परिणामी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे. दुसरीकडे, कला शाखेच्या महाविद्यालयांना अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असल्याने प्रवेशासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडूनच या शाखेकडे वळण्याची शक्यता आहे.
अकरावी प्रवेशासाठी
www.mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. १९ आणि २० मे रोजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे, त्यानंतर २० मे रोजी रात्री पोर्टलवरील माहिती काढून टाकण्यात येणार आहेत, तसेच २१ मेपासून प्रत्यक्षात अर्ज भरणे आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देता येणार आहेत. २८ मेपर्यंत नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.
६ जूनला महाविद्यालयाची यादी प्रसिद्ध
ऑनलाइन वेळापत्रकानुसार ३० मे रोजी सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवर ३० मे ते १ जूनपर्यंत हरकती नोंदविता व दुरुस्ती करता येणार आहे. ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी, ५ जून रोजी प्रवेश वाटप तर ६ जूनला महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
महाविद्यालयात अशा आहेत जागा
तालुका - विद्यार्थी संख्या
शिराळा - २१००
आटपाडी - २५६०
जत - ३८००
कडेगाव - १४२०
कवठेमहांकाळ - १६६०
खानापूर - २८४०
मिरज - ३२२०
पलूस - २३००
महापालिका क्षेत्र - ८३८०
तासगाव - २६४०
वाळवा - ६२४४
शाखानिहाय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता
शाखा - विद्यार्थी संख्या
कला - १५३८९
वाणिज्य - ६५३५
विज्ञान - १५७८०
एकूण - ३७१३४
यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. २१ मेपासून नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देता येणार आहेत. त्यानंतर ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही प्रवेश ऑनलाइनशिवाय होणार नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी नोंदणी व कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. -राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी, सांगली.