दर उतरल्यामुळे रस्त्यावर फेकले कांदे, सांगलीत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
By अशोक डोंबाळे | Updated: October 24, 2024 16:52 IST2024-10-24T16:51:25+5:302024-10-24T16:52:08+5:30
सांगली : सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गेले काही दिवस आनंदाचे वातावरण होते. पण त्यांचा आनंद व्यापाऱ्यांनी ...

दर उतरल्यामुळे रस्त्यावर फेकले कांदे, सांगलीत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
सांगली : सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गेले काही दिवस आनंदाचे वातावरण होते. पण त्यांचा आनंद व्यापाऱ्यांनी जास्त काळ टिकू दिला नाही. सांगलीच्या विष्णूअण्णा पाटील फळे मार्केटमध्ये कांद्याची जादा आवक होताच दर पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गडगडला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त बनले. विक्रीस आणलेला कांदा चक्क रस्त्यावर उधळला. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर रास्ता रोको केला.
येथील कोल्हापूर रस्त्यावरील मार्केटमध्ये वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांनी कांदा आणला होता. गेले काही दिवस चांगला दर असल्यामुळे गुरूवारी देखील चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आवक जास्त झाल्यामुळे दर गडगडला. शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराची ही कमालीची घसरण पाहून संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली.
कांदा उत्पादक शेतकरी एकवटले. त्यांनी सौदे बंद करून आणलेला कांदा रस्त्यावर फेकून देऊन संताप व्यक्त केला. तसेच रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जोपर्यंत कांद्याला कालपर्यंत असणारा साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यायला व्यापारी तयार होत नाहीत, तोपर्यंत बाजार समितीत कुठलाही सौदा होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.