Sangli: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अपघात, म्हैसाळ-मिरज रोडवर ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी
By अविनाश कोळी | Updated: January 2, 2024 17:00 IST2024-01-02T16:59:28+5:302024-01-02T17:00:56+5:30
अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅक्टरचा समोरील भाग तुटून वेगळा झाला

Sangli: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अपघात, म्हैसाळ-मिरज रोडवर ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी
म्हैसाळ : मिरज-म्हैसाळ रस्त्यावर देवल फार्मजवळ उसाची मोकळी ट्रॅक्टर व कारच्या धडकेत ट्रॅक्टरचालक आमसिध्द रावसाहेब देवकाते (वय ३० रा. तिकोडी ता. जत) हा ठार झाला, तर कारचालक इम्रान अल्लाबक्ष शेख (वय ३२ रा.मांजरी कर्नाटक) हा जखमी झाला आहे. सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसाळ हून मिरजेकडे ट्रॅक्टर चालला होता. तर मिरजेकडून एक कार म्हैसाळच्या दिशेने जात होती. यावेळी देवल फार्म हाऊस जवळ दोन्ही गाड्यांची धडक झाली. अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅक्टरचा दर्शनी भाग तुटून वेगळा झाला. कारचाही चक्काचूर होऊन कार रस्ताकडेच्या शेतात जाऊन पडली होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. याबाबत अधिक तपास बळीराम पवार हे करीत आहेत.
नवीन वर्षाची सुरूवात अपघातानेच
सोमवारी नवीन वर्षाची सुरुवात झाली. याच रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. रात्र असल्याने गावात या अपघाताची माहिती जास्त पसरली नाही. मात्र मंगळवारी म्हैसाळ मधील नागरिक नोकरीनिमित्त या रस्तावरून प्रवास करताना ट्रॅक्टर व कारची अवस्था पाहून नवीन वर्षाची सुरुवात अपघातानेच झाली, अशी खंत या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.