मंगल अष्टकाआधी नवरदेवाने केली शिवगर्जना, सांगली परिसरात या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:23 IST2022-02-12T18:58:18+5:302022-02-12T19:23:18+5:30
मंगल अष्टका सुरू होण्याआधीच अशी काही शिवगर्जना केली की सारे वातावरण शिवमय झालं

मंगल अष्टकाआधी नवरदेवाने केली शिवगर्जना, सांगली परिसरात या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा; व्हिडिओ व्हायरल
अशुतोष कस्तुरे
पलूस : सध्या विवाह सोहळे हटके पद्धतीने करण्याचा जणू ट्रेडच आला आहे. कोणी विमानात, पाण्याखाली यासह अनेक युक्त्या लढवत विवाह बंधनात अडकल्याचे आपण आधीही पाहिले आहे. असाच काहीसा अनोख्या पद्धतीचा विवाह सोहळा पलूस येथे पार पडला.
या विवाह सोहळ्यात नवरदेव शिवाजी महाराजांच्या पेहराव्यात बोहल्यावर चढला. अन् त्याने मंगल अष्टका सुरू होण्याआधीच अशी काही शिवगर्जना केली की सारे वातावरण शिवमय झालं.
धनगाव (ता.पलूस) चे उच्च शिक्षित असलेले ओंकार निवास पाटील आणि प्रियांका मोरे यांच्या काल, शुक्रवारी विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नवरदेव ओंकारने ज्या आवाजात शिवगर्जना म्हटली ती ऐकून सर्वांच्या अंगावर शहारे उभे राहिले आणि आपसूकच लग्न सोहळ्यात महाराजांचा जयघोष झाला.
यावेळी ओंकारने छत्रपती संभाजी महाराज, आई जिजाऊ महाराज यांचाही जयघोष केला. नवरदेवाने केलेल्या या शिवगर्जनेचा व्हिडिओ सांगली परिसरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.
ओंकार पाटील यांना गड किल्ल्यांना भेटी देण्याची आवड आहे. प्रत्येक रविवारी ते कोणत्या ना कोणत्या किल्ल्याला भेट देत असतात. त्यांच्या या शिवगर्जनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.