Sangli Crime: रेठरेधरणमधील कुख्यात गुंड भावशा पाटीलला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:16 IST2023-02-10T18:15:59+5:302023-02-10T18:16:21+5:30
हल्ल्यानंतर त्याने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत दहशत निर्माण करताना, ‘माझे नाव सांगेल त्याला जिवंत ठेवणार नाही, म्हवण्या ॲक्सिडेंटमध्ये मेला, असे सांगायचे’, अशी दमदाटी करत पळून गेला होता.

Sangli Crime: रेठरेधरणमधील कुख्यात गुंड भावशा पाटीलला जन्मठेप
इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील कुख्यात गुंड भावशा ऊर्फ भाऊसाहेब वसंतराव पाटील (वय ४४) याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या खटल्यात दोषी धरले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील पहिले जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी त्याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम जखमी मोहन पाटील यांच्या वारसांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
भावशा पाटीलने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी दोन वर्षे साधा कारावास भोगावा लागणार आहे. खुनाच्या प्रयत्नाची ही घटना १७ वर्षांपूर्वी २७ जानेवारी २००६ रोजी रेठरेधरण गावातील बसस्थानक परिसरात घडली होती. याबाबत संभाजी दादासाहेब पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी पक्षाकडून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, भावशा पाटील आणि दादासाहेब पाटील-खंडागळे यांच्यामध्ये वैमनस्य होते. जखमी मोहन रंगराव पाटील (वय ६०) त्याच्या शेजारी राहत होते. मात्र, खंडागळे कुटुंबाशी त्यांची मैत्री असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. मोहन पाटील आपली माहिती खंडागळे कुटुंबाला देतात, असा संशय आणि राग भावशाला असायचा. याच रागातून त्याने २७ जानेवारी २००६ रोजी मोहन पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यानंतर त्याने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत दहशत निर्माण करताना, ‘माझे नाव सांगेल त्याला जिवंत ठेवणार नाही, म्हवण्या ॲक्सिडेंटमध्ये मेला, असे सांगायचे’, अशी दमदाटी करत पळून गेला होता.
भावशाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. भावशाने मोहन पाटील यांना जिवे ठार मारण्याचा उद्देशानेच हल्ला केला. त्यानंतर त्याने अनेक गुन्हे केले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल आहे. त्याला जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
वैद्यकीय अहवालावर लागली शिक्षा
भावशाच्या दहशतीला घाबरून अनेक साक्षीदार फितूर झाले. यातील जखमी मोहन पाटील यांचेही काही वर्षांनी निधन झाले. तपास अधिकारी व्ही. एन. चव्हाण यांचेही निधन झाले. मात्र, फिर्यादी संभाजी पाटील आणि वैद्यकीय अहवालात आरोपीच्या अंगावरील जप्त कपड्यावर जखमी मोहन पाटील यांच्या रक्ताचे नमुने सापडल्याचा निष्कर्ष आल्याने हे पुरावे ग्राह्य धरून न्या. गांधी यांनी भावशाला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि हवालदार सुनील पाटील यांनी सरकार पक्षाला मदत केली.