नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: मातेचे अश्रू पुसण्यासाठी धावले खाकी वर्दीतले देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:37 PM2022-07-26T12:37:25+5:302022-07-26T12:38:39+5:30

पोलिसांमधली माणुसकी, मायेचा ओलावा याबाबत वारंवार शंकांचे वादळ उठविणाऱ्या समाजातून आता याच खाकी वर्दीतल्या माणुसकीला सलाम ठोकला जात आहे.

Newborn abduction case, Tasgaon police arrested the kidnapped woman within a few hours | नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: मातेचे अश्रू पुसण्यासाठी धावले खाकी वर्दीतले देवदूत

नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: मातेचे अश्रू पुसण्यासाठी धावले खाकी वर्दीतले देवदूत

Next

दत्ता पाटील

तासगाव : पोलिसांमधली माणुसकी, मायेचा ओलावा याबाबत वारंवार शंकांचे वादळ उठविणाऱ्या समाजातून आता याच खाकी वर्दीतल्या माणुसकीला सलाम ठोकला जात आहे. आईच्या पोटातून जन्म घेऊन एक दिवसही न झालेल्या बाळाचे अपहरण झाले आणि तासगाव पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन लोकांना घडले. तहान-भूक हरपून बाळाच्या शोधासाठी पोलिसांनी जिवाचे रान केले अन् दिवस ढळायच्या आत बाळाला आईच्या पदरात दिले. एका आईसाठी देवदूत बनलेल्या पाेलिसांवर म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

तत्परता, गांभीर्य, माणुसकी हे शब्द पोलिसांना गैरलागू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. पोलिसांचे हृदय कठोर असते, असेही म्हटले जाते, पण तासगाव पोलिसांनी हे सर्व गैरसमज दूर केले. तासगावच्या खासगी रुग्णालयातून एक दिवसाच्या नवजात बाळाचे अपहरण झाल्याने बाळाची आई हादरली. तिच्या काळजात धस्स झालं. नातेवाईक, रुग्णालय प्रशासनही हादरले.

सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी ही घटना सर्वदूर पसरल्यानंतर जिल्हाच नव्हे, तर राज्यभर हळहळ व्यक्त झाली. ‘त्या’ बाळाचे अन् आईचे होणार काय, असा प्रश्न सामान्यांना सतावू लागला. घटनेने हादरलेल्यांच्या गर्दीत एकच दिलासादायी हात नातेवाईकांच्या खांद्यावर पडत होता, तो पोलिसांचा होता. चिंतेच्या अंधारात हरवलेल्या मातेलाही पोलिसांनी सांगितले की, बाळ लवकरच तुमच्या हाती असेल. पोलिसांच्या माध्यमातून प्रकाशाचा एकच किरण त्या आईला दिसला.

अपहरणकर्त्या महिलेचा कोणताच ठावठिकाणा नव्हता. तिने दिलेला मोबाईल नंबरही चुकीचा आढळला. सीसीटीव्ही फुटेज हाच काय तो एकमेव तपासाला आधार होता. तरीही पोलीस हताश झाले नाहीत. त्या मातेला तिचे बाळ परत करायचे, हे एकच ध्येय बाळगून पोलिसांनी पायाला भिंगरी लावली. ना पोटात अन्न घेतले, ना शरीराला विश्रांती दिली. स्वत:च्या कुटुंबालाही कधी वेळ न देणाऱ्या पोलिसांनी एका बाळाला वाचविण्यासाठी ताकद व कौशल्य पणाला लावले. दिवस उजडायच्या आत त्यांनी या बाळाला सुखरूप आईकडे सोपविले. अपहरणकर्त्या महिलेलाही जेरबंद केले.

Web Title: Newborn abduction case, Tasgaon police arrested the kidnapped woman within a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.