कठीण पेपरमुळे ‘नीट’चे मेरीट खाली येणार, विस्तृत प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:37 IST2025-05-09T13:37:10+5:302025-05-09T13:37:42+5:30
पुरेसा वेळ मिळाला नसल्याची खंत

कठीण पेपरमुळे ‘नीट’चे मेरीट खाली येणार, विस्तृत प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ
सांगली : यंदा ‘नीट’च्या कठीण पेपरमुळे वैद्यकीय प्रवेशासाठीचे मेरीट खाली येण्याची दाट शक्यता आहे. विस्तृत प्रश्नांमुळे वेळ कमी पडल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मागील वर्षाच्या नेमकी उलट परिस्थिती यावेळी मेरीटमध्ये दिसून येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट २०२५ची परीक्षा यंदा देशभरात सुरळीत पार पडली. ‘नीट’ परीक्षेत गतवर्षी झालेले गैरप्रकार आणि तुलनेने सोपा पेपर यामुळे मेरीट मोठ्या प्रमाणात वाढले होते. गतवर्षी ७२० पैकी ७२० गुण मिळविणारे तब्बल ६७ विद्यार्थी होते. यासंदर्भात विविध न्यायालयांत याचिका दाखल झाल्यानंतर फेरतपासणीअंती पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ वर आली. वैद्यकीय प्रवेशासाठीचे मेरीट गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले होते. यावर्षी मात्र नेमकी याउलट स्थिती सर्वत्र दिसून येत आहे.
मोठ्या अपेक्षेने चांगले गुण मिळतील म्हणून नीट परीक्षेला गेलेले अनेक विद्यार्थी निराशेने बाहेर पडले. बायोलॉजीच्या पेपरमधील प्रश्न प्रचंड विस्तृत असल्याने ते वाचण्यातच अनेक विद्यार्थ्यांचा वेळ गेला. त्यामुळे केमेस्ट्री आणि फिजिक्स या विषयांसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. केमेस्ट्री तसा तुलनेने सोपा असला तरी फिजिक्स मात्र सर्वात कठीण होता, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांत इतका कठीण पेपर कधीच आला नसल्याचे मत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले आहे. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
पेपर कठीण असला तरी विद्यार्थी आणि पालकांनी निराश होण्याचे कारण नाही. नीट परीक्षेतील गुणांपेक्षा ऑल इंडिया रँक, महाराष्ट्रातील रँक आणि कॅटेगरी रँक यावरच वैद्यकीय शाखेतील प्रवेश अवलंबून आहे. विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत अडीच लाखाने कमी असल्याने रँक चांगली येईल, अशी अपेक्षा आहे. यावर्षी मेरीट मोठ्या प्रमाणात खाली येईल. - डॉ. परवेज नाईकवाडे, समुपदेशक, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया, सांगली