सांगली : राष्ट्रवादी पक्ष हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या पवार कुटुंबापुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादी एकत्रिकरणाची केवळ चर्चाच आहे, अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. सांगलीत घरेलू कामगार आरोग्य तपासणी कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील हे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत नेहमीच होतात; पण, पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात होत नाहीत. आताही सारखी चर्चा चालली आहे. अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे.
जयंत पाटील वगैरे हे सर्वजण लांब उभे असतात. तुम्ही काय निर्णय घेणार ते सांगा. या तिघांचा मिळून पक्ष आहे. रोहित पवार वगैरे हेदेखील सर्वजण लांबच आहेत. या तिघांच्या एकत्रीकरणाची अशी चर्चा खूप वेळा होते; पण ती काय अजून प्रत्यक्षात आलेली नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.जयंत पाटील, रोहित पवारांना चिमटापवार कुटुंबाच्या एकत्रित येण्याच्या चर्चेत पक्षातील अन्य कुणी नेते नसतात. अगदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही लांब थांबलेले आहेत. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. काय निर्णय झाला, याची विचारणा करण्यासाठी लांबच थांबलेत. रोहित पवार हे या चर्चेपासून दूरच असतात, असा टोला पालकमंत्री पाटील यांनी लगावला.