निसर्गाची देणगी! शिराळ्यात दुर्मिळ 'खापर खवल्या' सापाचे दर्शन; सर्पमित्रांनी केले सुरक्षित स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:14 IST2025-10-26T16:14:03+5:302025-10-26T16:14:21+5:30
Sangli News: सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घटना शिराळा येथे नुकतीच घडली आहे. येथील गुरुवार पेठ येथे दुर्मिळ समजला जाणारा आणि विशेषतः 'खापर खवल्या' जातीचा बिनविषारी साप आढळून आला. निसर्गातील जैवविविधतेचे प्रतीक असलेला हा साप दृष्टीस पडल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

निसर्गाची देणगी! शिराळ्यात दुर्मिळ 'खापर खवल्या' सापाचे दर्शन; सर्पमित्रांनी केले सुरक्षित स्थलांतर
- विकास शहा
शिराळा - सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घटना शिराळा येथे नुकतीच घडली आहे. येथील गुरुवार पेठ येथे दुर्मिळ समजला जाणारा आणि विशेषतः 'खापर खवल्या' जातीचा बिनविषारी साप आढळून आला. निसर्गातील जैवविविधतेचे प्रतीक असलेला हा साप दृष्टीस पडल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
सध्या अनेक दुर्मीळ वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत दिसून येत असताना, शिराळा येथे 'खापर खवल्या' सापाचे दर्शन होणे, ही येथील समृद्ध नैसर्गिक वातावरणाची साक्ष आहे. गुरुवार पेठ येथील सूर्यकांत शहा यांच्या घराजवळील नाल्याजवळ विपुल शहा यांना हा साप दिसला.काळया रंगाचा पिवळ्या ठिपक्याचा एक फूट लांबीचा सदर साप दिसल्यावर तातडीने वनपाल दत्तात्रय शिंदे यांना याबाबत कळविले. प्राणिमात्र सुशीलकुमार गायकवाड तातडीने याठिकाणी आले.यावेळी विपुल शहा व गायकवाड यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने या दुर्मीळ सापाला पकडले. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, त्याला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या मदतीने त्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आले.
या सापाची माहिती घेतली असता'खापर खवल्या' जातीचा बिनविषारी साप हा साप असल्याचे समोर आले.जमिनीखाली राहणारा आणि सहसा कमी दिसणारा आहे. त्याच्या शेपटीचे टोक गोलाकार, खडबडीत आणि खवल्यांनी झाकलेले असते, ज्यामुळे त्याला 'खापर खवल्या' हे नाव पडले आहे. या सापाची माहिती मिळताच परिसरातील जागरूक सर्पमित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले.
जागरूकतेचे कौतुक
विपुल शहा यांनी दाखवलेली जागरूकता आणि सर्पमित्रांनी केलेले अचूक रेस्क्यू ऑपरेशन यामुळे या दुर्मीळ जीवाचे प्राण वाचले. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी, तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवून त्याचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण शिराळावासियांनी घालून दिले आहे.
नाग भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी स्लेंडर कोरल स्नेक म्हणजे “पोवळा सर्प” असं म्हटलं जातं हा साप आढळून आला होता तर आज खापर खवल्या साप आढळून आला आहे.वन्यजीव अभ्यासकांच्या मते, 'खापर खवल्या' सापाचे आढळणे हे परिसंस्थेच्या आरोग्यासाठी शुभचिन्ह मानले जाते. या घटनेमुळे शिराळ्याच्या निसर्गातील दुर्मिळ जीवांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली आहे.