Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:45 IST2025-07-26T19:45:22+5:302025-07-26T19:45:53+5:30

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे : पारंपरिक वाद्य वाजविल्यास सत्कार करून बक्षीस देऊ

Nag Panchami should be celebrated as per the order of the High Court, attention should be paid to villages that catch snakes | Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

संग्रहित छाया

शिराळा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्यावी. आवाजाचे प्रदूषण झाल्यास डॉल्बी आदींवर कारवाई करण्यात येईल. पारंपरिक वाद्य, ढोल वाजविल्यास त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करून बक्षीस देऊ, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी केले.

येथील तहसीलदार कार्यालयात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित नाग मंडळे, ग्रामस्थ यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते विभागीय पोलिस अधीक्षक सचिन थोराबोल, तहसीलदार शामला खोत पाटील, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख घुगे यांनी न्यायालयाच्या सूचनांचे पालन तंतोतंत पाळावे. आठ वाजेपर्यंत मिरवणूक काढावी. डॉल्बी आदींवर कारवाई करण्यात येईल. पोलिस, वनविभाग, स्थानिक प्रशासन व नागरिक यांनी समन्वयाने नागपंचमी साजरी करावी.

आपत्कालीन सेवेसाठी मार्ग मोकळा ठेवावासंपूर्ण सणावर सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरे मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. धार्मिक भावनांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वागत कमानी स्टक्चरल ऑडिट करून घ्यावे स्वागत कमानीवर आक्षेपार्ह मजकूर नको, सेलिब्रिटीच्या नावाखाली नर्तकी नकोत, अफवा पसरवू नका, सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पसरवू नका आदी सूचना दिल्या.

यावेळी रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, पृथ्वीसिंह नाईक, वसंत कांबळे, अजय जाधव, आबासाहेब काळे, वैभव कुंभार, जयसिंग गायकवाड, वीरेंद्र पाटील, लालासाहेब तांबिट, फिरोज मुजावर, अभिजित शेणेकर, सचिन नलवडे, स्वप्नील निकम, संतोष हिरुगडे, धन्वंतरी ताटे, सम्राट शिंदे, राम पाटील नाग मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

यावेळी ओझर्डे, सुरुल, कुरळप, सरुड, बांबवडे, मांगले याठिकाणी जिवंत नाग पकडून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे शिराळा येथील नागरिकांच्यावर गुन्हे दाखल केल्याने त्रास होतो, अशी तक्रार करण्यात आली. यावेळी या सर्व गावांवर लक्ष ठेवण्यात येईल, असे सांगितले.

डॉल्बीवर कारवाई

डॉल्बीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो याबाबत संघटनेमार्फत तीन वर्षांपासून निवेदन देतो मात्र कोणताही कारवाई होत नाही अशी भूमिका जयसिंगराव गायकवाड यांनी मांडली. यावेळी प्रशासन करवाई करेल तसेच गावाबाहेरच अशी वाहने अडवली जातील, असे आश्वासन दिले.

Web Title: Nag Panchami should be celebrated as per the order of the High Court, attention should be paid to villages that catch snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.