मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:22 IST2022-02-19T17:21:57+5:302022-02-19T17:22:37+5:30
हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.

मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती
मिरज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यभरात विविध ठिकठिकाणी पोवाड्याचे, व्याख्यानाचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शिवजयंतीच्या मुख्य दिनी सकाळपासूनच सर्वत्र शिवमय वातावरण झाले आहे. रस्त्यावर शिवज्योत घेवून जाणारे तरुणाचे जथ्ये, चौकाचौकात भगवे झेंडे, गडकोटांच्या प्रतिकृती, विद्युत रोशनाईने शहर परिसर सजले आहेत.
तर आज सकाळपासून जन्मकाळ सोहळा, व्याख्याने, पोवाडे आदी विविध कार्यक्रम, उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. जात, धर्म या पलिकडे जाऊन रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरजेतील मुस्लिम महिलांनीही उत्साहात साजरी केली. हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुमय्या रोहिले, आफ्रीन रोहिले, शहनाज मुल्ला, तबस्सुम रोहिले, नजो शिलेदार आदी उपस्थित होते. सुमय्या रोहिले म्हणाल्या, महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना प्रचंड आदर होता. महाराजांच्या काळात हिंदू-मुस्लीम असा भेद कधीच नव्हता. कर्नाटकातील बहुचर्चित हिजाबचे प्रकरण देशाच्या हिताचे नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या राज्यांमध्ये राहतो याचा अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या.