मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:20 IST2025-07-31T17:59:19+5:302025-07-31T18:20:41+5:30

''जो' प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही'

Munde's name came up and my persecution began Anna Dange opened up while rejoining BJP after 23 years | मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

मुंबई/इस्लामपूर : आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे, असे एका घटनाक्रमाने प्रमोद महाजन यांच्या मनात आले आणि तेव्हापासून माझा छळवाद सुरू झाला, त्यामुळे मी भाजप सोडून गेलो, अशी वेदना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी बुधवारी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करताना बोलून दाखविली. ‘अण्णा! आपण भाजप सोडून गेलात याची खंत मुंडे साहेबांनाही होती’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सावरून घेतले.

आपले दोन मुलगे चिमण आणि विश्वनाथ तसेच समर्थकांसह अण्णांनी २३ वर्षांनंतर भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अण्णा डांगे म्हणाले की, जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरे-वाईट बोलणे योग्य नाही पण पक्षात त्यावेळी एक चुरस निर्माण झाली. अटलजींना कोणी विचारले की आपले उत्तराधिकारी कोण त्यावर त्यांनी प्रमोद महाजन यांच्यासह तीन-चार नावे घेतली. आपण पंतप्रधान होणार, असे महाजन यांच्या डोक्यात शिरले मग आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असेही त्यांच्या मनात आले अन् तिथून माझा छळवाद सुरू झाला. 

गेल्या १५ दिवसांपासून माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे पुत्र, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे आणि माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. बुधवारी, दि. ३० रोजी मुंबईत त्यांच्या घरवापसीवर शिक्कामोर्तब झाले. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक उपस्थित होते.

बाळासाहेबही माझ्या कामावर खूश होते

माझ्याकडे असणाऱ्या पाणीपुरवठा खात्यामार्फत सुमारे साडेपंधरा हजार कोटी रुपयांची टँकरमुक्तीची योजना चांगल्या रितीने राबविली जात होती. या कामाची दखल सर्वदूर घेतली गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या माझ्या कामावर खूपच खूश होते. उद्या भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव आले तर बाळासाहेब ते उचलून धरतील, असे चित्र होते, तेही अडचणीचे ठरले, असे अण्णा डांगे म्हणाले. 

‘तो’ प्रवेश आमच्या मनात नाही

सांगली जिल्ह्यातील आणखी कोणी मोठे नेते भाजपमध्ये येणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही.

घरची व्यक्ती घरी आल्याचा आनंद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णा..आपण ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला काय सांभाळणार? आपणच आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही चांगले काम करत राहू.  परखड स्वभाव असलेले अण्णा एका विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडून गेले, पण गोपीनाथरावांना त्याची नेहमीच खंत होती. तेव्हाही पक्षात त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान होता. 

अण्णांनी पक्ष सोडला पण त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यातून तयार झालेला विचार त्यांनी कधीही सोडला नाही.  भाजप हेच आपले घर आहे हीच त्यांची भावना नेहमी राहिली, घरची व्यक्ती घरी आल्याचा आम्हालाही आनंद आहे.  यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, चिमण डांगे आदींची भाषणे झाली.

पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश  

अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशासह इस्लामपूर येथील सुभाष देसाई (माजी नगरसेवक, अध्यक्ष - इस्लामपूर सर्व सेवा सोसायटी), भानुदास वीरकर (माजी जिल्हा परिषद सदस्य), अमोल आनंदराव चौधरी (अध्यक्ष, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड, इस्लामपूर), श्रीकांत माने (माजी नगरसेवक), महंमद गणीभाई (माजी नगरसेवक), जालिंदर कोळी (माजी नगरसेवक), गोपाल नागे (अध्यक्ष, सामाजिक न्याय सेल, राष्ट्रवादी पक्ष), तसेच बुरूड समाज सेवा संघटना, अभिजित रासकर (उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी पक्ष, इस्लामपूर), बाळासाहेब खैरे (जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) या पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

Web Title: Munde's name came up and my persecution began Anna Dange opened up while rejoining BJP after 23 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.