MP from Palawan to Vice President of Krishna Valley Corporation | पैलवान ते कृष्णा खोरे महामंडळ उपाध्यक्ष व्हाया खासदार
पैलवान ते कृष्णा खोरे महामंडळ उपाध्यक्ष व्हाया खासदार

सांगली : आक्रमक पद्धतीने राजकारण करण्याबरोबरच लोकांशी सततचा संपर्क, मनमिळावूपणा, साखरपेरणी अशा वैशिष्ट्यांनी ज्यांचे राजकारण सजते, त्यांच्या नशिबी यशाचे झेंडे आपोआप फडकत असतात. सांगलीच्या सावर्डेकर तालमीतला एक मल्ल ते राजकीय आखाड्यातील दिग्गज पैलवान, असा प्रवास करताना नूतन खासदार संजयकाका पाटील यांनी तुफान संघर्षमय वाटचाल केली आहे.
चिंचणी (ता. तासगाव) येथील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ४ जानेवारी १९६५ रोजी संजयकाका पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामचंद्र तथा आर. के. पाटील पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले. अत्यंत धडाडीचे आणि कर्तृत्ववान अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. संजयकाका पाटील यांचा जन्म तासगाव तालुक्यातील असला तरी बालपण, तारुण्य सांगली शहरात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पटवर्धन हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले. येथील मामांच्या सावर्डेकर तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरविले. तीन वर्षे त्यांनी विविध मैदानांमध्ये मल्ल म्हणून नाव कमावले. मात्र पैलवानकीत ते फारसे रमले नाहीत. शालेय शिक्षणापासूनच त्यांना संघटनबांधणीत यश मिळू लागले. मित्रपरिवार वाढविण्याचे कसब त्यांच्याअंगी होते. त्याचा लाभ त्यांना राजकीय प्रवेशाकरिता झाला. माजी आमदार दिनकरआबा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील हे त्यांचे चुलते.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली शहरात त्यांनी राजकीय कारकीर्द महाविद्यालयीन जीवनापासून सुरू केली. वसंतदादा पाटील यांना प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी राजकारणास सुरुवात केली. सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. कुस्तीच्या डावपेचांपेक्षा त्यांना राजकीय डावपेच, त्याचे कौशल्य, त्याची कार्यपद्धती जास्त भावली. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रगतीचा, संघर्षाचा प्रवास सांगली शहरातूनच सुरू झाला.

संजयकाका पाटील
उपाध्यक्ष, कृष्णा खोरे महामंडळ (वय : ५४)
शिक्षण : बारावी
आक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्ध
पत्नी ज्योती, मुलगा प्रभाकर, मुलगी वैष्णवी
माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा युवक काँग्रेस
माजी आमदार (विधानपरिषद)
माजी उपनगराध्यक्ष, सांगली नगरपालिका
माजी सदस्य, जिल्हा परिषद सांगली
आर. आर. पाटील यांच्याशी संघर्षाने राज्यभर डंका
१९९९ आणि २00४ च्या तासगाव विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी लढत देऊन निसटता पराभव स्वीकारला, मात्र त्यांचा हा संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. आर. आर. पाटील यांना शह देणारा नेता म्हणून ते प्रसिद्ध झाले होते.

आमदार, महामंडळ आणि खासदार
संजयकाका पाटील यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदे भूषविली. २00८ मध्ये त्यांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्टÑवादीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. पाठोपाठ त्यांना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर त्यांनी २0१४ मध्ये भाजप प्रवेश करून पुन्हा खासदारकी व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले. तत्पूर्वी १९९३ मध्ये त्यांनी सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भूषविले होते. १९९६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी बाजी मारली. नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती अशा महत्त्वाच्या संस्थांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले. गणपती जिल्हा संघाचे नेतृत्वही ते करीत आहेत.


Web Title: MP from Palawan to Vice President of Krishna Valley Corporation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.