कोजागरी पौर्णिमेला विधवा महिलांच्या सन्मानाचे चांदणे, सांगलीत अनोखा उपक्रम, पाद्मपूजन अन् हळदी-कुंकूचा मान
By अविनाश कोळी | Updated: October 6, 2025 23:20 IST2025-10-06T23:19:41+5:302025-10-06T23:20:17+5:30
Sangli News: आयुष्यातील वेदनांचा, सन्मानापासून दूर लोटण्याचा अंधकार दूर करीत विधवा महिलांच्या सन्मानाची कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सांगलीत साजरी करण्यात आली. औक्षण तसेच पाद्यपूजन करीत सन्मानाच्या शीतल चांदण्यांचा शिडकावा या उपक्रमातून करण्यात आला. भारावलेल्या या महिलांच्या डोळ्यांमध्ये यामुळे आनंदाश्रू तरळले.

कोजागरी पौर्णिमेला विधवा महिलांच्या सन्मानाचे चांदणे, सांगलीत अनोखा उपक्रम, पाद्मपूजन अन् हळदी-कुंकूचा मान
- अविनाश कोळी
सांगली - आयुष्यातील वेदनांचा, सन्मानापासून दूर लोटण्याचा अंधकार दूर करीत विधवा महिलांच्या सन्मानाची कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सांगलीत साजरी करण्यात आली. औक्षण तसेच पाद्यपूजन करीत सन्मानाच्या शीतल चांदण्यांचा शिडकावा या उपक्रमातून करण्यात आला. भारावलेल्या या महिलांच्या डोळ्यांमध्ये यामुळे आनंदाश्रू तरळले.
येथील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पत्की यांनी विधवा महिलांचे संघटन करून ‘सुवासिनी’ नावाचा ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विधवा महिलांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्याची चळवळ राबविली जाते. यापूर्वीही संक्रांतीच्या सणावेळी हळदी-कुंकू व वाण देऊन विधवा महिलांना मान-पानाचा गोडवा दिला होता. त्यांच्याकडून वडपूजनाची परंपराही सुरू केली.
यावेळी अस्मिता पत्की म्हणाल्या, विधवा महिला हा समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना दुय्यम वागणूक देणे हे अन्यायकारक आहे. आम्ही या महिलांना प्रत्येक सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सन्मानाने स्थान देण्याचा संकल्प केला आहे. समाजातील प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होऊन महिलांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रेरणा द्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात विधवा महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कोजागरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात महिलांनी एकमेकांचे औक्षण आनंद व्यक्त केला. या उपक्रमात नीता इंजतकर, सुनीता शिंदे, मीना मिरासदार, विजया कोरे, सुजाता पाटील, सुमन महिंद्रकर, सरस्वती बाबर, निर्मला देशपांडे, लता भंडारे, मुक्तामाई पवार, संगीता सुतार, स्मिता देशपांडे, स्मिता कुलकर्णी, सुनीता लिपारे, सुचित्रा कुलकर्णी, अनिता थोरात, करुणा चव्हाण यांनी सहभाग घेतला.