अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने राजकीय वातावरण तापले, पोलिसांचे कॉल डिटेल्स तपासणीची आमदार बाबर यांची विधानसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:30 IST2025-07-18T18:29:53+5:302025-07-18T18:30:17+5:30
मुलीला न्याय मिळणार का? नराधमांना कडक शिक्षा होणार का?

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने राजकीय वातावरण तापले, पोलिसांचे कॉल डिटेल्स तपासणीची आमदार बाबर यांची विधानसभेत मागणी
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील अल्पवयीन मुलीने चार नराधमांच्या लैंगिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याच्या संतापजनक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण आटपाडी तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. “मुलीला न्याय मिळणार का? नराधमांना कडक शिक्षा होणार का?” असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर पीडितेच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी करगणीत दाखल झाले. त्यांनी “आरोपींना शिक्षा होईल,” अशी ग्वाही दिली. मात्र, घटनेनंतर तब्बल आठ तास पोलिस निष्क्रिय का होते, असा सवाल उभा राहतो. गावकऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई न करता ‘वरून आदेश’ येण्याची वाट पाहिली, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी राजकीय हस्तक्षेपाचा थेट आरोप केला. “कोणातरी मोठ्या नेत्याचा दबाव आहे,” असे खुलेआम बोलले जात असून, आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत पोलिसांच्या कॉल डिटेल्सची मागणी केली आहे.
जनतेचा विश्वास ढासळणार
ही घटना राजकारण, पोलिस यंत्रणेची निष्क्रियता आणि जनआक्रोशामुळे हलणारी न्यायप्रक्रिया यांचा विषारी संगम आहे. जर आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाहीतील जनतेचा विश्वास कायमचा ढासळेल. मुलीला खरा न्याय मिळणार का, हे उत्तर आता काळच देईल.