आमदार अनिल बाबरांच्या पत्नी शोभा यांचे अल्पशा आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:34 IST2022-08-03T11:22:50+5:302022-08-03T13:34:25+5:30

आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय वाटचालीत त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

MLA Anil Babar wife Shobha passed away due to a short illness | आमदार अनिल बाबरांच्या पत्नी शोभा यांचे अल्पशा आजाराने निधन

आमदार अनिल बाबरांच्या पत्नी शोभा यांचे अल्पशा आजाराने निधन

विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर (वय-६२) यांचे आज, बुधवारी सकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. त्या काकी या नावाने सर्वत्र परिचित होत्या. आज सायंकाळी गार्डी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून शोभाकाकी यांना फुफ्फुसाचा त्रास होत होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांना विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु त्यानंतर यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते.

मुलगा नगरसेवक अमोल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास आणि स्वतः आ. अनिल बाबर हे देखील त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार  अनिल बाबर यांची दीनानाथ रुग्णालयात जाऊन भेट घेत काकींच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

मात्र आज, बुधवारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय वाटचालीत त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या निधनाने खानापूर मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात पती आमदार अनिलभाऊ, तसेच माजी नगरसेवक अमोल बाबर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर ही दोन मुले, दीर, जाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Web Title: MLA Anil Babar wife Shobha passed away due to a short illness

टॅग्स :Sangliसांगली