म्हैसाळ हत्याकांड: आरोपीची घटनास्थळी नेऊन चाैकशी, हत्याकांडबाबत दिली नेमकी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:16 IST2022-06-30T14:28:16+5:302022-06-30T15:16:59+5:30
मृत वनमोरे यांच्या बंगल्यात तसेच टेरेसवर नेऊन हत्याकांड कसे घडविले? याबाबत आरोपीने माहीत दिली.

म्हैसाळ हत्याकांड: आरोपीची घटनास्थळी नेऊन चाैकशी, हत्याकांडबाबत दिली नेमकी माहिती
मिरज : म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबाच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी अटकेतील संशयित धीरज चंद्रकांत सुरवशे याला बुधवारी म्हैसाळ येथे घटनास्थळी नेऊन हत्याकांडाच्या घटनेची माहिती घेण्यात आली. मृत वनमोरे यांच्या बंगल्यात तसेच टेरेसवर नेऊन हत्याकांड कसे घडविले? याबाबत आरोपीने माहीत दिली. हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार मांत्रिक आब्बास बागवान हा उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल आहे.
म्हैसाळमधील पशुवैद्यकीय डॉ. माणिक वनमोरे व शिक्षक पोपट वनमोरे या बंधूंसह त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांच्या सामूहिक हत्येप्रकरणी मांत्रिक आब्बास महंमदअली बागवान व धीरज चंद्रकांत सुरवशे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील बागवान याच्या छातीत दुखत असल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी संशयित धीरज सुरवशे याला म्हैसाळ गावात घटनास्थळी नेऊन रविवारी (दि. १९) रात्री वनमोरे बंधूंच्या घरात सामूहिक हत्याकांड कसे केले याची माहिती जाणून घेतली. यावेळी मयत वनमोरे बंधूंचा बंगला, टेरेस, बाल्कनी, हॉल, किचन, बेडरूम, बंगला परिसराची पाहणी करून पुरावे शोधण्यात आले. मांत्रिक आब्बास बागवान यास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घटनास्थळी आणून त्याचीही चौकशी केली जाणार आहे.