ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच, सांगलीत ‘म्हाडा’मधील शिपायास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:24 IST2025-10-16T12:23:42+5:302025-10-16T12:24:31+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपविभागीय कार्यालयात केली कारवाई

ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच, सांगलीत ‘म्हाडा’मधील शिपायास अटक
सांगली : घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाच घेताना ‘म्हाडा’च्या उपविभागीय कार्यालयातील शिपाई विजय यशवंत गंगाधर (४८, रा. साखराळे, ता. वाळवा) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात ही कारवाई केली.
तक्रारदार यांनी ‘म्हाडा’कडून घर खरेदी केले होते. या घराचे वीज आणि पाणी कनेक्शन नावावर करण्यासाठी ‘म्हाडा’च्या सांगलीतील उपविभागीय कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी तेथे कार्यरत असणाऱ्या शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. १५) तक्रार अर्ज केला.
तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. शिपाई गंगाधर याने तक्रारदार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने म्हाडाच्या कार्यालयात सापळा लावला. शिपाई विजय गंगाधर याने तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यास तत्काळ पकडण्यात आले.