धक्कादायक! बिअरमधून विष पाजून ‘त्या’ महिलेचा खून, कॉल डिटेल्सवरून लागला खूनाचा छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 14:15 IST2022-08-12T14:14:09+5:302022-08-12T14:15:15+5:30
तिच्याकडून वारंवार होणारा अपमान आणि त्रासाला कंटाळून बिअरमधून विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! बिअरमधून विष पाजून ‘त्या’ महिलेचा खून, कॉल डिटेल्सवरून लागला खूनाचा छडा
आटपाडी : शहरातील विद्यानगर येथील मीना बाळासाहेब जावीर (वय ३८) या महिलेच्या मृत्यूचा गुंता सोडविण्यास आटपाडी पोलिसांना दीड महिन्यांनी यश आले आहे. तिच्याकडून वारंवार होणारा अपमान आणि त्रासाला कंटाळून बिअरमधून विषारी द्रव्य पाजून तिचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी राजेंद्र बबन पांढरे (वय ३३, रा. गोटेवाडी ता. तासगाव), हर्षदा शिवाजी लांडगे (२०, रा. साठेनगर, आटपाडी) व योजना दत्तात्रय पाटील (३२, रा. विद्यानगर, आटपाडी) यांना अटक करण्यात आली आहे.
मृत मीना जावीर खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होती. याच कंपनीत संशयित रवींद्र पांढरे, हर्षदा लांडगे, योजना पाटील काम करत होते. मीना ही रवींद्रकडे वारंवार पैशांची मागणी करत होती. पैसे दिले नाहीत तर बदनाम करण्याची धमकी देत होती. यामुळे रवींद्रच्या मनात तिच्याबद्दल राग होता, तर हर्षदा आणि योजना या दोघींनाही कंपनीतील कामावेळी मीना वारंवार अपमान करून बोलत होती. यातूनच तिघांनी संगनमत करून तिचा काटा काढायचे ठरविले.
त्यानुसार २४ जून रोजी रवींद्रने तासगाव येथील कंपनीच्या कार्यालयात बिअरमधून विषारी द्रव्य देऊन तिला संपविण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने सोबत आणलेली विषारी द्रव्याची बाटली हर्षदाला दिली. २७ जूनरोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हर्षदा व योजना या दोघी मीनाच्या घरी गेल्या व त्यांनी तिला बिअरमध्ये विषारी द्रव्य मिसळूून पिण्यास दिले. बियर पिल्यानंतर ती मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या.
कॉल डिटेल्सवरून छडा
मीनाच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. मात्र, पोलिसांना याबाबत शंका असल्याने त्यांनी तपास करत त्यावेळचे कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील पंचनामा करून तिघांना गजाआड केले.