कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:52+5:302021-06-26T04:19:52+5:30
मिरज : मिरजेत महापालिकेच्या बेडग रस्त्यावरील कचरा डेपोवर कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील ...

कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर
मिरज : मिरजेत महापालिकेच्या बेडग रस्त्यावरील कचरा डेपोवर कोविड रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने वड्डी व बोलवाड ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मिरज शहरातील कचरा मिरज बेडग रस्त्यावर असणाऱ्या कचरा डेपो परिसरात टाकण्यात येतो. या कचऱ्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून विलगीकरण करण्यात येते. शहरातील वैद्यकीय कचरा संकलन व विल्हेवाटीसाठी महापालिकेने खासगी ठेकेदार नियुक्त केला आहे. वैद्यकीय कचरा जाळून नष्ट करायचा असतानाही या ठेकेदाराकडून वैद्यकीय कचरा बेडग रस्त्यावर कचरा डेपोत उघड्यावर टाकण्यात येत आहे. सध्या कोरोना साथीमुळे कोरोना संक्रमण वाढत असतानाही खासगी कोविड रुग्णालयातील वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिका आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने वड्डी आणि बोलवाड ग्रामस्थ कचरा डेपोत वैद्यकीय कचरा टाकण्यास प्रतिबंधाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मिरज शहरात घंटागाड्यातून कोविड रुग्णालयाच्या कचऱ्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता कचरा डेपोत कोविड रुग्णालयांचा कचरा टाकण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने महापालिका आरोग्य विभागाचा भाेंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.