शिराळ्यातील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती, आयसीयू, शस्त्रक्रिया विभाग बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:25+5:302021-03-24T04:24:25+5:30

शिराळ्यातील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग, आयसीयू शस्त्रक्रिया विभागाला कुलपे लावलेली दिसत आहेत. विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ...

Maternity, ICU, surgery departments of Shirala sub-district hospital closed | शिराळ्यातील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती, आयसीयू, शस्त्रक्रिया विभाग बंदच

शिराळ्यातील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती, आयसीयू, शस्त्रक्रिया विभाग बंदच

शिराळ्यातील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग, आयसीयू शस्त्रक्रिया विभागाला कुलपे लावलेली दिसत आहेत.

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले, सर्व सोयी-सुविधा आहेत, आवश्यक वैद्यकीय अधिकारी आहेत; मात्र गेल्या पाच वर्षांत एकही शस्त्रक्रिया, बाळंतपण अथवा साधी स्त्री नसबंदी शस्त्रक्रियासुद्धा झालेली नाही हे तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.

ग्रामीण रुग्णालय होते त्यावेळीही सर्व सोयींनी युक्त शस्त्रक्रिया विभाग होता. सर्व सुविधा होत्या. आता तर २५ कोटी रुपये खर्चून उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे. याठिकाणी प्रसूती कक्ष आहे, शस्त्रक्रिया कक्ष आहे, अतिदक्षता विभाग आहे; मात्र या तिन्ही विभागांना कुलपे लावण्यात आली आहेत. स्त्री रोगतज्ज्ञ , बालरोगततज्ज्ञ तसेच इतर वैद्यकीय अधिकारी आहेत तसेच भूलतज्ज्ञ गरज असल्यास बोलाविण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, येथे बाळंतपण, सिझरिंग, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया तसेच इतर लहानमोठ्या शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना अवघड शस्त्रक्रिया तसेच महिलांच्या सिझरिंग, बाळंतपण यासाठी इतरत्र तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आ. मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख प्रयत्न करीत आहेत. मात्र, येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेर जावे लागते हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, बाळंतपण सुविधा दिली जात आहे. मात्र, या मोठ्या रुग्णालयात या सुविधा मिळत नाहीत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

चौकट-

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात

* १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया - १८४

* बाळंतपण नोंद १६५९ यापैकी ७७५ तालुक्यात झाली. यातील २९१ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात तर खासगी रुग्णालयात ४८४ अशा ७७५ झाल्या आहेत. उर्वरित ८८४ तालुक्याबाहेरील दवाखान्यात झाल्या आहेत.

Web Title: Maternity, ICU, surgery departments of Shirala sub-district hospital closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.