सांगलीत कृष्णा नदीतून वाळूचा बेमाप उपसा!, महसूलची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:05 IST2025-04-16T16:05:16+5:302025-04-16T16:05:40+5:30

कृणाघाटावर बेकायदा औटी

Massive extraction of sand from Krishna River in Sangli | सांगलीत कृष्णा नदीतून वाळूचा बेमाप उपसा!, महसूलची डोळेझाक

छाया-कौसेन मुल्ला

मिरज : राज्यात सर्वत्र नदीतून वाळूउपशावर निर्बंध असताना कृष्णा नदी मात्र नियमाला अपवाद ठरली आहे. कृष्णाघाटावर कृष्णेतून बेबंदपणे वाळू उपसा सुरू आहे. या उपशाला महसूल प्रशासनाने रीतसर परवाना दिला आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

कृष्णाघाटावर अर्जुनवाड (जि. कोल्हापूर) गावाच्या हद्दीत वाळू उपशासाठी औटी तयार करण्यात आली आहे. नदीतून बोटीद्वारे उपसा करून वाळू बाहेर काढली जात आहे. उपसा केलेली वाळू विक्रीसाठी ट्रॅक्टरमधून भरभरून नेली जात आहे. माती उपशासाठी औटी तयार केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र वाळूचाच उपसा सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी दिसून आले.

कृष्णा नदीच्या उगमापासून महाराष्ट्र हद्दीत कोठेही वाळूउपशाला परवानगी नाही. शासनाने वाळूचे लिलाव अद्याप सुरू केलेले नाहीत. गेल्या सुमारे सहा-सात वर्षांपासून वाळू उपसा बंद असल्याने बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा वापर सुरु झाला आहे. मात्र काही घरमालक व बांधकाम ठेकेदार वाळूच्याच वापरावर ठाम असतात. त्यांच्यासाठी चोरट्या पद्धतीने वाळूउपसा केला जात आहे. वाट्टेल त्या किमतीला या वाळूची विक्री व खरेदी होते.

महसूलची डोळेझाक?

वाळूतस्करांच्या या कृत्यामुळे कृष्णेची ओरबड सुरू आहे. राजरोस, भरदिवसा औटी तयार करून वाळूचा उपसा सुरू असतानाही स्थानिक तलाठी व महसूल प्रशासन शांत कसे? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. या कामावर चौकशी केली असता मातीच्या उपशासाठी औटी केल्याचे सांगण्यात आले, प्रत्यक्षात मात्र वाळूचाच उपसा सुरू असल्याचे दिसून आले. उपसलेली वाळू ट्रॅक्टरमधून भरून विक्रीसाठी नेली जात होती.

Web Title: Massive extraction of sand from Krishna River in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.