सांगलीत फटाक्याच्या कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट; आवाजाने ४-५ किमी परिसर हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:45 IST2025-12-22T12:44:23+5:302025-12-22T12:45:17+5:30
दोघे गंभीर जखमी, स्फोटाने परिसर हादरला, कारखान्याचे शेड सुमारे चारशे फूट दूर फेकले गेले

सांगलीत फटाक्याच्या कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट; आवाजाने ४-५ किमी परिसर हादरला
दिलीप मोहिते
विटा : शोभेच्या दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात दोघेजण गंभीर जखमी झाले. या स्फोटाने चार ते पाच कि.मी.चा परिसर हादरला असून कारखान्याचे शेड सुमारे चारशे फूट दूर फेकले गेले आहे. आफताब मन्सुर मुल्ला (वय ३०, रा. भाळवणी) व अमीर उमर मुलाणी (वय ४०, रा. चिंचणी-अं., ता. कडेगाव) असे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना भाळवणी (ता. खानापूर, जि. सांगली) येथे सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
भाळवणी येथील मन्सूर मुल्ला यांचा बसस्थानकाच्याजवळ शोभेची दारू फटाका निर्मिती करण्याचा कारखाना आहे. येथील पत्र्याच्या एका शेडमध्ये शोभेचे फटाके तयार केले जातात. सोमवारी सकाळी या कारखान्यात त्यांचा मुलगा अफताब मुल्ला व नातेवाईक अमीर मुलाणी हे दोघेजण स्फोटकाची दारू कुटण्याचे काम करीत होते.
त्यावेळी दारूने अचानक पेट घेतला. त्यामुळे तेथे असलेल्या दारू साठ्याचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, पत्र्याचे शेड तीनशे ते चारशे फूट उडून बाजूला फेकले गेले. तर या स्फोटाचा आवाज चार ते पाच कि. मी. पर्यंत पोहचला. तसेच भाळवणी गावातील कारखान्याच्या शेजारी असलेल्या घरांच्या तसेच काही मोटारींच्या काचांनाही तडे गेले आहेत.
या स्फोटात अफताब मुल्ला व अमीर मुलाणी हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच विटा अग्निशमन तसेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी दोघांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांचीही प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने खानापूर तालुका हादरून गेला आहे.