Maratha Kranti Morcha : सांगली जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम, मांगलेत एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 15:50 IST2018-07-26T13:25:21+5:302018-07-26T15:50:49+5:30
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही होते.

Maratha Kranti Morcha : सांगली जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम, मांगलेत एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले
सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही होते.
गेल्या चार दिवसापासून आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजतर्फे राज्यभरात आंदोलन सुरु आहे. सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गुरुवारी सकाळी वारणानगर-शिराळा ही एसटी (क्र. एमएच १४-८९३१) मांगर्लेमार्गे निघाली होती.
शिवाजी चौकापर्यंत बस आली. पण पुढे रस्त्यावर लाकडी ओंडके ठेवण्यात आले होते. त्यामुळे चालकाने रस्त्याकडेला एसटी थांबविली. तेवढ्यात एसटीवर जोरदार दगडफेक सुरु झाल्याने चालकासह प्रवाशी बचावासाठी सीटखाली लपून बसले. त्यानंतर पाठीमागून टायरच्याबाजूने अज्ञातांनी एसटी बस पेटविली.
हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांनी पाहिला. त्यांनी बस पेटल्याचे आरडा-ओरड करुन सांगितले. काही ग्रामस्थांनी पुढे येऊन प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. चालकानेही बसमधून उडी मारली. तोपर्यंत बस चारही बाजूंनी पेटली होती. या घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मदतीने पाण्याचा मारा करुन बसची आग विझविण्यात आली. ही बस शिराळा आगाराची आहे.
शोकसभा रद्द
आंदोलनास पाठींबा देण्यासाठी गुरुवारी गाव बंद, तसेच फेरी काढून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी चौकात सकाळी दहा वाजता शोकसभा आयोजित केली होता. यासाठी झेंडेही आणले होते. ग्रामस्थांनी सकाळपासून उस्फूर्तपणे बंद पाळला होता. पण तोपर्यंत बस पेटवून दिल्याची घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. शोकसभा रद्द करण्यात आली.