सामाजिक जाणिवेतून २०१८ मध्ये ‘जमियात उलमा ई हिंद’चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, हाफिज सद्दाम सय्यद, सुफियान पठाण यांच्यासह तरुणांनी एकत्र येत मदनी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. जिल्हाभरात या ट्रस्टचे सात हजार सभासद, तर दाेन हजारांवर कार्यकर्ते आहेत. स्थापनेच्या दुसऱ्याच वर्षी कृष्णा-वारणेच्या महापुराने जिल्ह्याच्या पश्चिम भागाला तडाखा दिला. या दरम्यान ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी मदत व बचावकार्यात प्रशासनाच्या बराेबरीने याेगदान दिले.
मार्च २०२० मध्ये काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व जिल्ह्यात काेराेनाचा शिरकाव झाला. या दरम्यान ट्रस्टने माेठे काम केले. काेराेना प्रतिबंधक उपायांबाबत कार्यशाळा घेऊन जनजागृती केली. कंटेन्मेंट झाेनमध्ये नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, तसेच किराणा साहित्याचे वाटप केले. जिल्ह्यात अडकून पडलेल्या सुमारे ७०० स्थलांतरित मजुरांना तब्बल ३६ दिवस दाेन वेळचे जेवणाचे डबे पुरविले. सुमारे सात हजार गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे किट पुरविले. तसेच दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक साहित्याचे किट पुरविले.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये काेराेना मृतांची संख्या वाढल्याने त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला हाेता. यावेळी ट्रस्टने सुमारे १३७ मृतांवर त्यांच्या धार्मिक रीती-परंपरेनुसार अंत्यविधी पार पाडले. या दरम्यान प्रशासनाकडे मृतदेहांसाठी पीपीई किट नसल्याची बाब समाेर आल्यानंतर मृतदेहांसाठी पीपीई किटची व्यवस्था केली. मृतदेह वाहून नेण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे समाेर आल्यानंतर मार्केट यार्ड येथील कब्रस्तान तसेच पंढरपूर राेड येथील स्मशानभूमीत दाेन स्ट्रेचर उपलब्ध करून दिले. प्रशासनाला एक रुग्णवाहिका व एक शववाहिका देऊ केली.
शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमास मदतीचा हात दिला. महापालिका क्षेत्रात आराेग्य महामेळावा घेऊन पाचशेहून अधिक नागरिकांची आराेग्य तपासणी केली. जिल्ह्यात रक्ताची टंचाई लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेतले.
अवघ्या दाेन वर्षांच्या काळात ट्रस्टने काेराेनासारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये प्रशासनास माेठी मदत केली. याशिवाय ट्रस्टच्या वतीने दरमहा सुमारे १३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किट देण्यात येते. शासनाच्या विविध याेजना जनतेपर्यंत पाेहाेचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. व्यसनमुक्ती अभियान चालविले जाते. ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत दीड हजारावर रुग्णांची माेतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अन्य रुग्णांना शासकीय याेजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. वृद्धाश्रम, बालसुधारगृहे, अपंग सेवाकेंद्रांना वेळाेवेळी लागेल ते सहकार्य केले जाते.