लोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:50 IST2021-04-16T15:47:48+5:302021-04-16T15:50:56+5:30
Road Sefty Shirala Sangli : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात आला आणि या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरु करण्यात आले आहे.

लोकमत इफेक्ट -चिंचोली बसस्थानकाजवळील तीव्र वळण कमी करण्याचे काम सुरु
विकास शहा
शिराळा : चिंचोली ( ता. शिराळा ) येथील बसस्थानकाजवळील फरशी पुलाच्या भिंतीच्या आतून रस्त्यातूनच गटाराचे बांधकाम करण्याचा अजब प्रकार करून तीव्र वळणाची रुंदी कमी करण्यात आली होती. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरोधात आवाज उठवण्यात आला आणि या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडली होती. हे तीव्र वळण कमी करण्याचे तसेच गटारीचे सुधारित काम सुरु करण्यात आले आहे.
सध्या या तीव्र वळणावरील फरशी पुलाच्या उत्तरेकडील बाजूने गटाराचे बांधकाम करत तीव्र वळण कमी करण्याचे काम सध्या केले जात आहे. परंतु दक्षिण दिशेला बांधण्यात असलेल्या गटाराचे काम नियमानुसार केले नसल्याचे दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी संतप्त भावना ग्रामस्थांच्यामधून व्यक्त केली जात आहे.
या तीव्र वळणावरील फरशी पुलाची रुंदी कमी असल्याने आधीच ग्रामस्थांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. कारण यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने त्यात काहींचे प्राणही गेले होते. त्यातच रस्त्यातून गटाराचेही बांधकाम करुन या ठेकेदाराने ग्रामस्थांनच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.
कराड ते रत्नागिरी असा हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वहातुक सुरू असते त्यात आता या मार्गाचे रुंंदीकरण झाल्याने वहातुकीत खूप मोठी वाढ होईल आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर शेताकडे चालणाऱ्या रहदारीला, गुरांना नदीला पाण्यासाठी घेऊन जाणारे गावकऱ्यांना व शाळेला चालत जाणाऱ्या चिमुकल्या लेकरांना या ठिकाणी भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने या तीव्र वळणाचे योग्य रुंंदीकरण होणे आवश्यक होते.
सामाजिक बांधिलकी
संवेदनशील चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी या फरशी पुलाला डबल नळे टाकण्यासाठी या आधीही संघर्ष केला होता. व आता हे तीव्र वळण कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करुन या वळणाचे रुंंदीकरणा करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांना गावातील युवकांनी चांगली साथ दिली.