Sangli: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग, ग्रामविकास विभागाने मागितली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:15 IST2025-05-19T16:15:25+5:302025-05-19T16:15:50+5:30
सांगली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

Sangli: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग, ग्रामविकास विभागाने मागितली माहिती
सांगली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय माहिती ग्रामविकास विभागाने मागितली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने माहिती गोळा करून शासनाकडे पाठविली आहे.
जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती ग्रामविकास विभागाने तत्काळ मागितली आहे. त्यानंतर पंचायत समितीची सदस्य संख्या निश्चित होणार आहे. काही ग्रामपंचायती शहरी भागात समाविष्ट झालेल्या आहेत. काही गावांचे तालुके बदललेले आहेत. काही गट ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आलेल्या आहेत. काही तालुक्यात ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्या आहेत. पुनर्वसनामुळे काही ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्येची सद्यःस्थिती त्वरित मागितली आहे.
जिल्ह्यातील संस्थांवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासकराजला सुरुवात झालेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली, तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रभागरचनेची प्रक्रिया करण्याचे आयोगाचे पत्र
सदस्यसंख्या निश्चिती, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी, त्यावर हरकती व सूचना मागविणे, सुनावणी, शिफारशीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढणे, त्यावरही हरकती, सूचना मागवून अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे, मतदार यादीचा कार्यक्रम व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करून प्रारूप प्रभागरचनेची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.
तीस लाखांवर लोकसंख्या गेल्याचा अंदाज
२०११ च्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या २,८ लाख २२ हजार १४३ होती. पुरुष १,४ लाख ३५ हजार ७२८ आणि महिला १,३ लाख ८६ हजार ४१५ होत्या. या लोकसंख्येत १४ वर्षांत किमान दोन लाखांनी वाढ होऊन ३० लाखांवर पोहोचली असण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या १४ वर्षांत जिल्ह्यात लोकसंख्या जनगणनाच झाली नाही.
चार आठवड्यांत अधिसूचना
२०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवून चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना काढावी लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील २०११ च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या
तालुका - लोकसंख्या
मिरज - ८,५४,५८१
वालवा - ४,५६,००२
जाट - ३,२८,३२४
तासगाव - २,५१,४०१
खानापूर - १,७०,२१४
पलूस - १,६४,९०९
शिराळा - १,६२,९११
कवठेमहांकाळ - १,५२,३२७
कडेगाव - १,४३,०१९
आटपाडी - १,३८,४५५