सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

By शरद जाधव | Published: August 16, 2022 11:53 PM2022-08-16T23:53:28+5:302022-08-16T23:54:35+5:30

१८ ऑक्टोबर २०२० रोजी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात ही घटना घडली होती.

Life imprisonment to a woman in the case of murder of a newborn baby in Sangli, the verdict of the district court | सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

Next


सांगली : मुलगी झाली म्हणून नवजात अर्भकाचा दुपट्याच्या साहाय्याने गळा आवळून खून करणाऱ्या महिलेस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. करगुट्टी, यल्लापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगावी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एल. मनवर यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

१८ ऑक्टोबर २०२० रोजी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात ही घटना घडली होती. आरोपी सुमित्रा हिचे पहिले मूल हे तीन दिवसांच्या आत मृत झाल्याने ती कर्नाटकातून प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. तिला मुलगी झाल्याचे कळल्यानंतर, ती नाराज होती. मुलगी झाली म्हणून तिने अर्भकाचा गळा आवळून खून केला होता. या प्रकरणी डॉ. मधुकर वामनराव जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात रोशनी कौशल शिंदे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. १८ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारसा अर्भकाचा दुपट्याच्या सहाय्याने गळा तिने आवळला होता. ही बाब शिंदे यांनी परिचारिका रूपाली बजंत्री यांना सांगितली होती. त्यांनी लगेच या अर्भकास लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला होता. 

या खटल्यास रोशनी शिंदे, डॉ. मधुकर जाधव, रूपाली बजंत्री, शारदा जुट्टी, शब्बीर हुजरे, अश्विनी चौगुले, श्रद्धा आंबळे व तपासी अधिकारी सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या साक्षी झाल्या. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामी पैरवी कक्षातील महिला पोलीस कर्मचारी वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ, सुप्रिया भोसले, इम्रान महालकरी यांचे सहकार्य लाभले.
 

Web Title: Life imprisonment to a woman in the case of murder of a newborn baby in Sangli, the verdict of the district court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.