सांगली जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी, कृष्णा नदीची पाणीपातळी मंदगतीने घटतेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 11:38 IST2022-08-17T11:37:51+5:302022-08-17T11:38:14+5:30
सांगलीत आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी बुधवारी २४.६ फूट इतकी आहे.

सांगली जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी, कृष्णा नदीची पाणीपातळी मंदगतीने घटतेय
सांगली : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्र ढगांची दाटी कायम असली तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र तुरळक पावसाने हजेरी लावली. कृष्णा नदीच्या पाणीपातळी मंदगतीने घट होत आहे. चोवीस तासांत केवळ १ फुटाने पाणीपातळी कमी होत असल्याचे दिसून आले. सांगलीत आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी बुधवारी २४.६ फूट इतकी आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगांची दाटी असल्यामुळे अपवादाने सूर्यदर्शन झाले. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागत आहे. पावसाचा जोर सर्वत्र ओसरला आहे. मंगळवारी धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला. कोयना व वारणा धरणातून अद्याप विसर्ग सुरूच आहे. अलमट्टीतून मोठा विसर्ग सुरू असला तरी सांगली जिल्ह्यातील पाणीपातळी मंदगतीने घटतेय. सोमवारी सकाळी ११ ते मंगळवारी सकाळी ११ या वेळेत कृष्णा नदीच्या सांगलीतील पाणीपातळीत केवळ १.३ फूट घट झाली.
धरण क्षेत्रांतील पाऊस घटला
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरण क्षेत्रात २०, तर वारणा धरण क्षेत्रात १३ मिमी पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत पावसाचा जोर कमी झाला आहे.