सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

By संतोष भिसे | Published: April 12, 2024 06:44 PM2024-04-12T18:44:59+5:302024-04-12T18:45:56+5:30

ताकारी, म्हैसाळ, टेंभूमधून डझनभर आमदार 

Leaders cultivated opinions on the water of irrigation schemes in Sangli | सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

सांगलीत सिंचन योजनांच्या पाण्यावर नेत्यांनी पिकविली मतांची शेती; ३५ वर्षांनंतरही साखरपेरणी सुरूच

संतोष भिसे

सांगली : ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेती फुलली आहेच, शिवाय राजकारण्यांनीही प्रत्येक निवडणुकीत या योजनांचे भांडवल करीत मतांची भरघोस पिके घेतली आहेत. आजवर या योजनांमधून डझनभर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे पीक आले आहे. सध्या ३५ वर्षांनंतरही प्रत्येक निवडणुकीत या योजनांच्या पाण्याची साखरपेरणी सुरूच आहे.

जिल्ह्यातील सिंचन योजना म्हणजे राजकारण्यांसाठी निवडणुकीतील प्रचाराचा हमखास मुद्दा ठरत आला आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असा बोलघेवडेपणा नेत्यांकडून केला जात असला, तरी सिंचन योजनांबाबतीत मात्र २० टक्केच समाजकारण आणि बाकीचे राजकारण असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच आज सुमारे ४० वर्षे होत आली तरी, म्हैसाळ योजना १०० टक्के पूर्ण होऊ शकली नाही. नेत्यांनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला. योजना पूर्ण होऊन शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे, यासाठी कुणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. आता सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही या योजनेचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी दिसत आहे. अगदी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही याच मुद्द्यावर रान तापलेले दिसणार आहे.

कवठेमहांकाळ, मिरज, जत, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी या टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी सिंचन योजनांचा मोठा आधार आहे. त्यांच्या पाण्यावरच अनेकदा निवडणुकीचे पारडे फिरल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच डॉ. पतंगराव कदम यांच्यापासून आर. आर. पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यासाठी या योजना जिव्हाळ्याच्या राहिल्या आहेत. अगदी अलीकडे विटा - खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनीही टेंभू, आरफळसाठी सातत्याने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

मिरज - कवठेमहांकाळचे तत्कालीन आमदार अजितराव घोरपडे यांनी म्हैसाळ योजनेच्या जोरावरच आमदारकीला आणि राज्यमंत्रिपदालाही गवसणी घातली होती. त्यांच्यापूर्वी शिवाजीराव शेंडगे यांनीही योजनेच्या आधारे मंत्रिपद मिळविले होते. जतला उमाजीराव सनमडीकर, मधुकर कांबळे, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप, विक्रम सावंत, तासगावला सुमनताई पाटील, विटा - खानापूरला सदाशिवराव पाटील, मिरजेला सुरेश खाडे, आटपाडीला राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासाठीही पाणी योजना हा हमखास गुलाल उधळणारा विषय ठरला आहे.

जिल्ह्याचे नेतृत्वही पाण्यावरच

जिल्ह्याचे नेतृत्व करायचे, तरी सध्या सिंचन योजनांचे नाणे खणखणीतपणे वाजवावे लागते. अर्थात, यातील राजकारण सोडले, तरी नेत्यांच्या कमी अधिक रेट्यामुळेच आज दुष्काळी भागात गंगा अवतरली आहे, हे मान्य करावे लागते. पतंगराव कदम, आर. आर. पाटील व जयंत पाटील यांनी म्हैसाळ योजना सतत प्रवाहीत ठेवून जिल्ह्याच्या पूर्व भागाला वेळोवेळी दिलासा दिला होता. हीच साखरपेरणी आता लोकसभा निवडणुकीतही सुरू आहे. जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी प्राणपणाने काम करू, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली जात आहे.

Web Title: Leaders cultivated opinions on the water of irrigation schemes in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.