विकास शहाशिराळा : सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या, ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ही वृक्षतोड नागरिकांनी वानरांच्या त्रासाला कंटाळून केली आहे.प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वतीने सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे .केल्यानंतर व शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असे आढळून येते की , शेतीच्या बांधावर असणारी मोठी झाडे तोडल्यानंतर वानरांचा त्रास कमी होईल , असे शेतकऱ्यांचे मत आहे . त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बांधावरची आणि ओढया शेजारील मोठी झाडे विचार न करता तोडली आहेत. वानरांचे शेतीवरील हल्ले कमी होण्यापेक्षा अधिक वाढले आहेत. वानरांना उपलब्ध होणारे नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळे आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास संपल्यामुळे वानरे जास्त प्रमाणात शेतीकडे आकर्षित होत आहेत .या संदर्भात संस्थेने एक उदाहरण दिले आहे. समजा एखाद्या गावातील १०० झाडे आहेत . त्यामधील काही शेतकऱ्यांनी ७० झाडे तोडली , तर उर्वरित ३० झाडांवर वानरे जास्त प्रमाणात आढळतात . ज्यांच्या मालकीची ही उरलेली तीस झाडे असतील ज्यांच्या मालकीची ही उरलेली तीस झाडे असतील त्यांना वानरांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो , त्यामुळे उरलेली तीस झाडे सुद्धा तोडली जात आहेत .
या प्रकारामुळे गावात असलेली सर्व झाडे नष्ट होत आहेत . तसेच माणूस आणि वानर यांच्यातील संघर्षाचे दृष्टचक्र वृक्षतोड करून थांबल्याचे दिसत नाही . महत्वाच म्हणजे त्या झाडावरील नैसर्गिक जैवविविधता देखील नष्ट होत आहे . या होणाऱ्या वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने कडुलिंब , जांभूळ , करंज , निलगिरी , आंबा , वड , पिंपळ , उंबर , काटेसावर इत्यादी वृक्षांच्या तोडीचे प्रमाण जास्त आहे .आपल्या पूर्वजांनी बांधावर झाड का ठेवले होते याचा विचार करणे गरजेचे आहे . बांधावरील झाडावर असणाऱ्या मधमाश्या शेतीतील पिकांचे परागीभवन करतात , झाडावरील पक्षी शेतीवरील किडीचा नाश करतात , मोठी झाडे जमिनीची धूप थांबवतात , सुपीक माती टिकवून ठेवतात , उन्हाळ्यात शेतकऱ्याला बसण्यास सावली , फळे, लाकूड फाटा , आयुर्वेदिक औषधी उपयोग तसेच शेतीला आडोसा असे अनेक फायदे शेतीच्या बांधावरील मोठी झाडे करून देतात. पूर्वजांचे हे विचार नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजेत.
सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोनाचे उदाहरण लोकांनी लक्षात घ्यावे व जगभरात तापमान वाढीमुळे होणारी भीषण परिस्थिती सुधारण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून आपले बांधावरील झाड वाचवावे. शेतकऱ्यांनी व लाकूड तोड करणाऱ्या कंत्राटदारांनी तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबवावी व पर्यावरण समतोल साधण्यास मदत करावी.-प्रणव महाजन ,पर्यावरण अभ्यासक, उपाध्यक्ष, प्लॅनेट अर्थ फौंडेशन.