corona virus: सांगली जिल्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे?, रुग्णसंख्येने गाठली शंभरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:34 IST2022-06-29T14:32:34+5:302022-06-29T14:34:03+5:30
मागील महिनाभर दररोज चार- पाच रुग्ण सापडत होते. मंगळवारी एकदम २३ रुग्ण आढळून आले.

corona virus: सांगली जिल्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे?, रुग्णसंख्येने गाठली शंभरी
सांगली : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा शंभरी गाठली आहे. मंगळवारी (दि. २८) नव्याने २३ रुग्ण सापडले. एकूण रुग्णसंख्या १०० वर पोहोचली आहे. यानिमित्ताने चौथ्या लाटेकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. मागील महिनाभर दररोज चार- पाच रुग्ण सापडत होते. मंगळवारी एकदम २३ रुग्ण सापडले. महापालिका क्षेत्रात ८ रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात १५ जण बाधित आढळले. विशेष म्हणजे एकट्या वाळवा तालुक्यात १० रुग्ण आढळले आहेत. कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यांत प्रत्येकी एक व शिराळा तालुक्यात तीन रुग्ण सापडले. सांगलीत तीन, तर मिरजेत पाच कोरोनाबाधित सापडले.
एकूण १०० कोरोनाबाधितांपैकी सात रुग्ण मिरज कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांना व्हेंटिलेटरद्वारे प्राणवायूचा पुरवठा सुरू आहे. उर्वरित रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत.
मिरज कोविड रुग्णालयात स्वतंत्र उपचार कक्ष सुरू केला असला, तरी बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांमुळे घरगुती विलगीकरणातच आहेत. विविध व्याधींमुळे कोरोनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारांसाठी प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, संभाव्य चौथ्या लाटेत उपचार पुन्हा सुरू करावे लागतील, अशी सूचना दिली आहे. प्राणवायूचा पुरेसा साठा करून ठेवण्यास सांगितले आहे.
दररोजच्या चाचण्या ५०० वर नेल्या
कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागल्याने जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्या दररोज ५०० वर नेली आहे. मंगळवारी २६५ आरटीपीसीआर चाचण्या केल्या असता २० बाधित निष्पन्न झाले. रॅपिड ॲन्टिजेनद्वारे ३२९ चाचण्या झाल्या, त्यात तिघे पॉझिटिव्ह सापडले.