कुणबी नोंदी सापडल्या, वंशावळ सिद्धची कसरत; आता कागदी लढाई खेळावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:53 AM2023-11-11T11:53:46+5:302023-11-11T11:54:31+5:30

१०० वर्षांच्या नोंदी सापडणे मुश्कील, महसूलकडील रेकॉर्डवर धुळीचे थर

Kunbi Records Found, Genealogy Tried; Now we have to play a paper battle | कुणबी नोंदी सापडल्या, वंशावळ सिद्धची कसरत; आता कागदी लढाई खेळावी लागणार

कुणबी नोंदी सापडल्या, वंशावळ सिद्धची कसरत; आता कागदी लढाई खेळावी लागणार

सांगली : जिल्ह्यात कुणबीच्या २२११ नोंदी सापडल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जाहीर केले आहे. या नोंदींनुसार वारसांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. शिवाय प्रमाणपत्रासाठी वारसदारांनाही वंशावळ सिद्ध करण्याची जिकिरीची कामगिरी पार पाडावी लागणार आहे.

महसूल विभागाने कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी १० लाख ६ हजार ६५५ दस्त आतापर्यंत तपासले आहेत. त्यातून मराठी आणि मोडी लिपीतील २ हजार २११ नोंदी आढळून आल्या आहेत. प्रशासनाने खासरा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे रजिस्टर, मागणी नोंदणी पत्रक, शैक्षणिक अभिलेख, जन्म मृत्यू नोंदी, करार खत, भाडेचिठ्ठी, मृत्युपत्र, माजी सैनिकांच्या नोंदी, सेवापुस्तक, सेवा अभिलेख, सैन्य भरतीच्या नोदी तपासून कुणबींचा शोध लावला आहे. त्याची माहिती आता शासनाला दिली जाणार आहे. त्यानंतर वारसदारांना तशी प्रमाणपत्रे वाटपाविषयी निर्णय होईल.

तत्पूर्वी वारसदारांना वंशावळ सिद्ध करावी लागेल. कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तीचे आपणच वारसदार आहोत हे कागदोपत्री दाखवावे लागेल. वंशावळ, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे सादर करावे लागतील. आता वंशावळ सिद्ध करण्याची नवी कागदी लढाई लढावी लागणार आहे. मात्र हे खूप मोठे आव्हान आहे.

कुणबीसाठी साधारणत: गेल्या १०० वर्षांतील नोंदी तपासण्यात येत आहेत. तहसील कार्यालयांत जन्म-मृत्यूच्या नोंदी (आडवा उतारा, फॉर्म क्रमांक १४) आहेत. त्यामध्ये व्यक्तीच्या नावापुढे जातीचीही नोंद आहे. पण मोडीतील नोंदी आणि त्याच्या वाचनातील संदिग्धता यामुळे अनेक नावे जुळत नाहीत. साहजिकच पुरावे मिळण्यात अडचणी येणार आहेत. कुणबी नोंदी लोकांना पाहण्यासाठी जाहीर होतील, तेव्हा त्यातील नावानुसार आपला पूर्वज ओळखावा लागेल. नोंद मिळाली, तरी संबंधित व्यक्ती आपला पूर्वज होता. तशी वंशावळ सिद्ध करावे लागणार आहे. १०० वर्षांची वंशावळ सिद्ध करताना दमछाक होणार आहे.

शासनाकडेच नाहीत, मग पुरावे आणायचे कोठून?

पुराव्यासाठी जमिनीचे खरेदी खत, सातबारावरील नोंदी, शैक्षणिक नोंदी किंवा अधिकृत वंशावळ द्यावी लागेल. ती मिळणे सोपे नाही. महसूलचे रेकॉर्ड सुस्थितीत नसल्याचा फटका बसणार आहे. विशेषत: मोडी लिपीतील रेकॉर्डची अवस्था अत्यंत वाईट आहे. रेकॉर्डवर धुळीचे थर साचलेत. शासनाकडेच कागद नसतील, तर आणायचे कोठून? हा अर्जदारापुढील मोठा प्रश्न असेल. महसूलच्या बेजबाबदारपणा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यातील मोठा अडसर ठरणार आहे.

Web Title: Kunbi Records Found, Genealogy Tried; Now we have to play a paper battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.