येडेमच्छिंद्रमध्ये क्रांतिसिंहांचा पुतळा सुशोभिकरण सुरू

By Admin | Updated: September 1, 2015 22:30 IST2015-09-01T22:30:36+5:302015-09-01T22:30:36+5:30

मुख्य चौकाचा चेहराच बदलणार : उद्योजक सर्जेराव यादव यांचा पुढाकार

Krantisiman statue of Yedemachhindra started beautifying | येडेमच्छिंद्रमध्ये क्रांतिसिंहांचा पुतळा सुशोभिकरण सुरू

येडेमच्छिंद्रमध्ये क्रांतिसिंहांचा पुतळा सुशोभिकरण सुरू

निवास पवार - शिरटे येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम इस्लामपूर येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी हाती घेतले आहे. सुशोभिकरणामुळे मुख्य चौकाचा चेहरामोहराच बदलणार असून यादव यांच्या या कामाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.
नाना पाटील यांचे वारस असणाऱ्या छगन पाटील यांच्या अकाली मृत्यूसमयी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी सरसावलेल्या सर्जेराव यादव यांची त्यावेळेपासून नाना पाटील यांच्या घराशी नाळ जोडली गेली. अंथरुणाला खिळून असणाऱ्या छगन पाटील यांच्या मातोश्री गायत्री पाटील यांचीही ते आपुलकीने चौकशी करत असतात. या कुटुंबाच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे सरसावलेले दिसतात.
येडेमच्छिंद्र येथे एका कार्यक्रमानिमित्त यादव आले होते. ग्रामपंचायतीलगत उघड्यावर असणाऱ्या क्रांतिसिंहांच्या पुतळ्यास अभिवादन करीत असताना विद्यमान सरपंच संजय पाटील यांच्यासमोर त्यांनी पुतळ्याच्या सुशोभिकरणाची संकल्पना मांडली. सर्वांच्या मान्यतेनंतर त्यांनी लगेचच पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. येणाऱ्या काही दिवसात हे काम पूर्णत्वास जाईल. पुतळा सुशोभिकरणाबरोबरच त्यांच्या आगामी उपक्रमांबाबत यादव यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, या परिसरातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देण्याचा मानस आहे. माती परीक्षणामुळे शेतीचा पोत सुधारेल व खतांमध्ये कशी बचत करता येईल याबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात येणार आहे. शेतीची माहिती मिळावी यासाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन देणार आहे. ग्रामीण भागात स्मशानभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. गावातील सर्वांच्या सहकार्यातून स्मशानभूमी ही ‘पवित्र भूमी’ म्हणून कशी उदयास येईल, याबाबतही जनजागरण करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नगरात मी राहतो. ज्या क्रांतिसिंहांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्यासाठी आपणाला काही तरी करता येईल का? हा विचार मनात घेऊन निरपेक्ष भावनेने पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. कितीही खर्च आला तरी हे काम पूर्ण करणारच.
- सर्जेराव यादव, उद्योजक, इस्लामपूर.

अष्टपैलू कामगिरी..!
क्रिकेट टीममध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूस जो मान, सन्मान असतो, तोच मान सर्जेराव यादव यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून मिळविला आहे. लग्नकार्यातील अक्षतारूपी वाया जाणारे तांदूळ वाचविण्यासाठी असणारी धडपड असो, की एखाद्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देणे असो, यादव हे नेहमीच पुढे सरसावतात. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत केली आहे.

Web Title: Krantisiman statue of Yedemachhindra started beautifying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.