Sangli: दादांनी आणायला सांगितलंय, गाडीत बस नाहीतर ठार मारु; अपह्रत पं.स. सदस्याने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:03 IST2026-03-12T18:03:15+5:302026-03-12T18:03:47+5:30
गोव्यातील कळंगुट बीचवर नेले : स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास

संग्रहित छाया
सांगली : ‘दादांनी आणायला सांगितलंय, गाडीत बस नाहीतर ठार मारु, अशी धमकी आपल्याला पिस्तूल रोखून दिल्याची तक्रार मिरज पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग इंगळे यांनी पोलिसात मंगळवारी दिली.
मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगाव (ता. मिरज)चे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आले होते. सभापती निवडीनंतर त्यांना मंगळवारी सायंकाळी मिरजेत सोडून देण्यात आले. पिस्तुलाच्या धाकाने चौघांनी अपहरण करून गोव्यातील कळंगुट बीचवर नेल्याचा जबाब इंगळे यांनी दिला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपहरण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषणच्या तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिस याचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे राजकीय पातळीवर या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत आणून नंतर सांगलीत सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला.
अपहृत सदस्य इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे, सभापती निवडीच्या आदल्या दिवशी दि. ९ रोजी बुधगाव-माधवनगर रस्त्यावरील शेतात गेलो होतो. सायंकाळी ५.३० वाजता एस्सार पेट्रोलपंपाजवळ मोटार घेऊन थांबलेल्या तिघांनी मला धरून मोटारीत जबरदस्तीने बसवले. त्यापैकी एकाने पिस्तूल रोखून खल्लास करण्याची धमकी दिली.
मोबाईल काढून घेऊन बंद केला. तेथून मला नागज फाट्यावर नेले. वाटेत मोटारीतून नेताना मारहाण करण्यात आली. तेथे दुसरी मोटर (एमएच १० ईए ७५००) आल्यानंतर चौघांनी मला त्यात बसवले. रात्री ११.३० च्या सुमारास कर्नाटक मार्गे पहाटे अडीच वाजता गोव्यातील कळंगुट बीचजवळ लॉजवर नेले.
दि. १० रोजी सकाळी नऊ वाजता तेथून परत गाडीत बसवले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वनखंडे सरांच्या घराजवळ आणले. दोघे उतरून घरात गेले. काहीवेळाने परत आले. नंतर सांगलीत लक्ष्मी मंदिर चौकाजवळ रात्री साडेआठ वाजता सोडले. तेथून सांगली ग्रामीण पोलिस मला घेऊन पोलिस ठाण्यात आणले. अपहरण प्रकरणात समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे.
दादा कोण?
इंगळे यांना जबरदस्तीने मोटारीत बसविल्यानंतर कोठे नेताय असे विचारल्यानंतर ‘दादांनी आणायला सांगितलंय, गाडीत बस’ असे म्हणून पिस्तूल रोखले होते असे जबाबात म्हंटले आहे. त्यामुळे दादा कोण? याचा पोलिस तपास करत आहेत.
निवडीपासून वंचित ठेवण्यासाठी अपहरण
सभापती, उपसभापती निवड प्रक्रियेत वंचित ठेवण्यासाठी तसेच अजित शेजूळ यांच्या आईला उपसभापतिपद मिळवताना माझे मत त्यांना मिळणार नाही हे गृहीत धरून अपहरण केल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हंटले आहे.