काका-पुतण्यातील सुसंवादाने कासेगावकरांना सुखद धक्का
By Admin | Updated: September 1, 2015 22:31 IST2015-09-01T22:31:35+5:302015-09-01T22:31:35+5:30
जयंतराव-देवराज दादांची चर्चा : विधानसभेनंतर प्रथमच एकत्र

काका-पुतण्यातील सुसंवादाने कासेगावकरांना सुखद धक्का
प्रताप बडेकर- कासेगाव माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील व त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून मतभेद असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. विधानसभेवेळी मानसिंगराव नाईक यांना कासेगावातून कमी मतदान मिळाल्यामुळे जयंतराव पुतण्यावर नाराज असल्याचीही चर्चा होती, परंतु येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात काका-पुतण्याने व्यासपीठावर हसत हसत अनेक विषयांवर सुसंवाद साधला. हे पाहून उपस्थितांना सुखद धक्का बसला.
कासेगाव (ता. वाळवा) हे जयंत पाटील यांचे गाव असल्याने जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या गावाला विशेष महत्त्व आहे. जयंतरावांमुळेच सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत देवराज पाटील यांना झेप घेता आली. देवराज पाटील यांनीही या संधीचे सोने करत समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला. नम्र, संयमी स्वभावाने विरोधकांशीही चांगले संबंध निर्माण केले. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कासेगावातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अपेक्षित मतदान मिळाले नाही.
विधानसभा निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात असलेल्या शिवाजीराव नाईक यांना मताधिक्य मिळाले. यामुळे जयंतरावांना धक्का बसला. त्यातूनच ते देवराज पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांच्यात मतभेद झाल्याचेही बोलले जात होते. जयंतरावांनी विविध कार्यक्रमातून नाराजी बोलून दाखवली होती. आपल्या गावानेच घात केल्याचे देवराज पाटील, लिंबाजी पाटील व रवींद्र बर्डे यांच्याकडे कटाक्ष टाकून ते बोलले होते.
तथापि येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोघे काका-पुतणे व्यासपीठावर हसतहसत विविध विषयांवर चर्चा करताना दिसले. या दोघांमध्ये पूर्वीप्रमाणेच संबंध निर्माण झाल्याचे पाहून उपस्थित कासेगावकरांसह देवराज पाटील समर्थकांना सुखद धक्काच बसला.
सबकुछ देवराज पाटील
ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील यांच्या आजारपणामुळे व वाढत्या वयाने सार्वजनिक व राजकीय व्यासपीठावरील त्यांचा वावर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे या परिसरातील कोणताही निर्णय घेताना त्यांचे पुत्र देवराज पाटील यांच्यावरच जयंतराव विश्वास टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देवराज पाटील यांची जबाबदारी वाढली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष असतांनाही देवराज पाटील यांनी चांगला कारभार करून राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचे लक्षवेधून घेतले होते. सध्या ते अध्यक्ष नसले तरीही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील संवाद बिघडू नये याकडे त्यांचे लक्ष असते.