मिरज : मिरजेतून मिरज, जयनगर मिरज नवीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुरु होणार आहे. मिरजेतून बिहारला जाणाऱ्या या रेल्वेसरेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून या विशेष एक्स्प्रेसचा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर अहमदाबाद साप्ताहिक एक्स्प्रेसचा राजकोटपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.विशेष एक्स्प्रेस जयनगर येथून दर मंगळवारी रात्री ११.५० वाजता सुटेल व मिरजेत गुरुवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. मिरजेतून दर शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता सुटेल व जयनगर येथे रविवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. या गाडीस पुणे,मनमाड,प्रयागराज,पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर,दानापूर,पटना जंक्शन, समस्तीपूर व दरभंगा याठिकाणी थांबे आहेत.मिरजेतून थेट बिहारला जाणारी ही गाडी प्रवासी, व्यापार, उद्योजक, कामगार व औद्योगिक क्षेत्रासाठी सोयीची आहे. सुमारे दोन आठवड्यात या विशेष गाडीची सुरुवात होण्याची शक्यता असून मिरजेतून प्रयागराज येथे कुंभमेळ्याला ही भाविकांना जाता येणार आहे. मिरजेतून आणखी लांबपल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.कोल्हापूर -अहमदाबाद एक्स्प्रेस आता राजकोटपर्यंतकोल्हापूरातून दर शनिवारी सुटणाऱ्या कोल्हापूर- अहमदाबाद गाडीचा आता राजकोटपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकात याचा समावेश करण्यात आला. गतवर्षी या एक्स्प्रेसचा राजकोटपर्यंत विस्तार करण्याची रेल्वेने अधिसूचना काढली होती. मात्र, वर्षभर त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रवासी संघटनांनी त्याचा पाठपुरावा केला. आता नवीन वेळापत्रकात या गाडीचा विस्तार राजकोटपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, मिरज, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना आता थेट राजकोटपर्यंत जाण्याची सोय झाली आहे. या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील,गजेंद्र कल्लोळी यांनी केले.
मिरजमधून जयनगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार, कुंभमेळा व बिहारला जाण्याची सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:16 IST