शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 19:22 IST2022-02-19T18:26:41+5:302022-02-19T19:22:30+5:30
मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले.

शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद
शिगाव : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २३) शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढा देत असताना जवान रोमित यांना वीरमरण आले.
जैनापुरातील चेरमार्ग भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी या परिसराची घेराबंदी करून सर्च ऑपरेशन सुरू केले होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. पण राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात असलेले शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण तसेच संतोष यादव हे दोघे जवान शहीद झाले.
पाच वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये रोमित भरती झाला होता. त्याचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे तर, माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात झाले होते. उच्च शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठवडगाव येथे झाले होते. इयत्ता बारावी कला शाखेत पास झाल्यानंतर तो भारतीय सैनिक दलामध्ये भरती झाला होता.
रोहितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखान्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात वडील, आई व एक बहीण असा परिवार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले.
उद्या, रविवारी (दि. २०) दुपारनंतर शहीद जवान रोमितचे पार्थिव शिगाव येथे पोहचण्याची शक्यता आहे. त्याचे अंत्यसंस्कार वारणा नदी काठी शासकीय इतमामात होणार आहे.